ग्रामीण गुन्हे पथकाची अहमदपूरला कारवाई
शिरुर- टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील दरोड्यातील तीन आरोपींना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. टाकळी हाजी नजीक टेमकरवस्ती येथे (दि.2) चोरट्यांनी सुधाकर मनोहर काळे यांच्या घराच्या दरवाजावर दगडे मारून व कटावणीने दरवाजा उघडून घरात प्रवेश करून महिलांचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण 67 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. तसेच काळे कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली होती. याबाबत शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरूर पोलीस स्टेशनसह गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी आदेश दिले होते. त्यानुसार पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी पथक तयार करून गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत असताना तपासादरम्यान हा आरोपी अहमदपूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अहमदपूर येथुन तीन आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी मंचर पोलीस स्टेशन हद्दीत वळती, रांजणी, पारगाव शिंगवे, मांदळवाडी तसेच पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत निघोज, टाकळी ढोकेश्वर, म्हसे, वडनेर, भाबुळवाडा येथे घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या आरोपींवर जबरी चोरी, दरोड्याची तयारी करणे, घरफोडी, चोरी आदी गुन्हे दाखल आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्यामुळे पकडलेल्या आरोपींबाबत पोलिसांकडून गुप्तता ठेवण्यात आली असल्याचे घनवट यांनी सांगितले.
आरोपींना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, राजू मोमीन, पोपट गायकवाड, दयानंद लिमन, मोरेश्वर इनामदार, शब्बीर पठाण, विशाल साळुंके, धीरज जाधव, बाळासाहेब खडके, प्रमोद नवले यांनी कामगिरी बजावली.