सातारा -पुण्याचे विभागीय उपायुक्त पी. बी. पाटील यांनी जिल्ह्यातील करोनासह आपत्ती परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा देण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली. यादरम्यान पाटील यांनी चेक पोस्ट, करोना केअर सेंटरलाही भेट देऊन माहिती घेतली. पाटील यांनी सकाळी शिरवळ येथील चेक पोस्टची तपासणी केली. जिल्हा परिषदेमध्ये करोना अनुषंगाने सर्व विभागांचा सादरीकरणाद्वारे आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे व मनोज जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील रुग्णसंख्या, उपलब्ध हॉस्पिटल, बेड संख्या तसेच जिल्ह्याचे नियोजन याबाबत यावेळी आढावा घेतला. पावसाचे दिवस सुरू होत असून रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता विचारात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. आपत्ती कालावधीमध्ये ग्रामपंचायत विभागाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. आगामी काळामध्ये शाळा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी चर्चा केली. आवश्यक आरोग्यविषयक सर्व उपकरणे, साहित्य याचा ताळमेळ घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परराज्यातून व परजिल्ह्यांतून आलेल्या नागरिकांसाठी रोजगार हमीच्या माध्यमातून तसेच इतर रोजगार संधी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. पावसाळ्यात साथीचे आजार पसरु नयेत, यासाठी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना पाटील यांनी आरोग्य विभागाला केल्या. पार्ले करोना केअर सेंटरला भेट उंब्रज (ता. कराड) येथे पी. बी. पाटील, संजय भागवत, डॉ. अनिरुध्द आठल्ये, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांनी प्राथमिक आरोग्य, फेसबुक ग्रुप सातारा व सह्याद्री ग्रुप कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले. पार्ले येथील करोना केअर सेंटरला त्यांनी भेट दिली. तेथील सुविधांबाबत माहिती घेऊन जेवण व राहण्याची व्यवस्था, स्वच्छता तसेच डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांच्या रजिस्टरची माहिती घेतली. अडचणींविषयी डॉक्टर व इतर सर्व स्टाफशी चर्चा केली.