चोर समजून जमावाकडून तिघांची हत्या

पालघर : पालघरमध्ये चोर असल्याचे समजून जमावाकडून तीन जणांची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली. पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील ही दुर्देवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेजण आपल्या इको कारने प्रवास करत होते. या दरम्या या तिघांना गडचिंचले भागातील काही लोकांनी पकडले आणि चोर समजून मारायला सुरुवात केली. त्यानंतर कासा पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी त्या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या जमावाने पोलिसांची गाडी फोडली. या घटनेच जमावाकडून झालेल्या मारहाणीत त्या तिघांचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान कासा पोलिसांनी आपला जीव कसाबसा वाचविला. याप्रकरणी पोलिसांनी तीस जणांना ताब्यात घेतले आहे. चोर आल्याच्या अफवेने ह्या भागात रोज रात्री गावागावातून जमाव करतात आणि असे हल्ले करतात अशा हल्ल्याची ही तीन दिवसातील दुसरी घटना आहे.
राज्यात असलेल्या टाळेबंदीच्या वातावरणात रात्रीच्या वेळी चोर व दरोडेखोर यांचा ग्रामीण भागात वावर होत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये पसरली आहे. त्यामुळे या भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच गुरूवारी रात्री गडचिंचले येथील ग्रामस्थांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या तीन व्यक्तींना चोर असल्याच्या गैरसमजातून दगड व इतर साहित्याने मारून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.





