पिंपरी – मांजर हा प्राणी कितीही उंचीवरून पडला तरी तो आपल्या पायावरच उभा राहतो, हे खरे असले तरी तिसऱ्या मजल्यावरून त्यांची सुटका करताना एका पिल्लाचा घेतलल्या अप्रतिम कॅचची (झेल) चर्चा आता पिंपरी-चिंचवड शहरात चांगलीच रंगली आहे. चिंचवडगावातील एका चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या एका मांजराच्या पिल्लाला रविवारी (दि. 26) सुखरूप सुटका झाली. पिंपरी-चिचंवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या जवानांनी पांढऱ्या शुभ्र मांजराला जीवनदान दिले. मात्र खाली घेत असताना त्याने बकेटमधून उडी घेतली. आणि त्यावेळी खाली उभ्या असलेल्या एका नागरिकाने त्या इवलुशा पिल्लाला अलगद झेलले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगावातील गोखले वृंदावनच्या एच-3 या इमारतीवरील तिसऱ्या मजल्यावर खिडकीच्या सिमेंट सज्जावर मांजर अडकले असल्याची माहिती अग्निशामक विभागाला समजली. त्यानुसार लिडिंग फायरमन भाऊसाहेब धराडे, वाहन चालक पद्माकर बोरावके, फायरमन शंकर पाटील, विष्णू चव्हाण, शिवलाल, नयन कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. आता इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर खिडकीच्या वरील सज्ज्यावर एक मांजराचे पिल्लू अडकले होते. जवानांनी शिडीच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावरील माळ्यावर जाऊन बकेटमध्ये मांजराच्या पिल्लाला बकेटमध्ये ठेवले. बकेट खाली घेत असताना त्या पिल्ल्याने अचानक खाली उडी मारली. त्यावेळी खाली उभ्या असलेल्या नारायण कदम या नागरिकाने त्या पिल्लाला अलगद झेलले व पुन्हा खाली सोडले. तो “कॅच’ अप्रतिम होता, अशी चर्चा आता चिंचवडगावासह पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे.