केसनंदच्या “दप्तरा’वरून सत्ताधारी पदाधिकारी गोत्यात?
दप्तर वकिलांकडे नेल्याचा सचिन धुमाळांचा आरोप : ग्रामविकास अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा प्रताप
वाघोली – केसनंद ग्रामपंचायतीच्या गैरकाभाराची चौकशीची विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी सुरू असताना पदाधिकारी, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर अनाधिकाराने एका वकिलाला दाखविण्यासाठी नेल्याचा आरोप ग्रामस्थ सचिन धुमाळ यांनी केला. दप्तर नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दप्तरामध्ये फेरफार केला असावा, असा आरोप धुमाळ, काही सदस्यांनी केला आहे.
धुमाळ यांनी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरकारभाराची तक्रार जिल्हा परिषद व संबंधित विभागाला केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून चौकशी केली आहे. चौकशीत अनेक मुद्दयांवर बोट ठेवले आहे. गैरकारभाराची सुनावणी विभागीय आयुक्तांसमोर सुरू आहे. शुक्रवारी (दि.9) याप्रकरणाची अंतिम सुनावणी होती. कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ग्रामविकास अधिकारी मिलिंद महाले व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सुनावणीचे कारण पुढे करीत दप्तर ग्रामपंचायतीच्या बाहेर नेले.
धुमाळ यांनी त्यांचा पाठलाग केला असता हे दप्तर पुण्यातील एका खासगी वकिलाला दाखविण्यासाठी नेल्याचे दिसले. धुमाळ यांनी त्याचवेळी आपले सरकार वेबसाईटवर तक्रार केली आहे. शुक्रवारी सदस्य ग्रामपंचायतीमध्ये दप्तर पाहण्यासाठी जमा झाले होते. त्यांनी दप्तर दाखविण्यास सांगितले. मात्र, त्यांना दप्तर दाखविले नाही. या घोळामुळे काही सदस्यांनी सकाळीच ग्रामपंचायतीत ठिय्या मांडला होता. उशिरा ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दप्तर दाखविले. दरम्यान, दप्तर बाहेर नेलेल्या आरोपांचे ग्रामविकास अधिकारी मिलिंद महाले, सरपंच अलका हरगुडे, उपसरपंच प्रणव ढोरे यांनी खंडन केले असून प्रशासकीय कामासाठीच दप्तर बाहेर नेल्याचे त्यांनी सांगितले. दप्तरबाबत ग्रामस्थांमध्ये गैरसमज झाला असावा, असे उपसरपंच ढोरे यांनी सांगितले.
प्रशासकीय कामासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दप्तर नेल्याचे सांगितले तरी सकाळी पुन्हा दप्तर ग्रामपंचायतीत आणणे गरजेचे होते. परंतु बराच काळ दप्तर गाडीमध्ये होते. दफ्तरामध्ये फेरबदलाची शक्यता आहे. विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होती. मात्र, अधिकाऱ्यांनी एक दिवसअगोदरच दप्तर सुनावणीचे कारण दाखवून नेले. दप्तर चेक केल्यानंतर मे महिन्याच्या ग्रामसभेचा वृत्तांत यात लिहिला नाही. तीन महिन्यापूर्वीची ग्रामसभेची नोंद केली नाही. याबाबत चौकशी गरजेचे आहे.
-सचिन जाधव, ग्रामपंचायत सदस्य, केसनंद.





