पिंपरी – कुदळवाडी येथील भंगाराच्या गोदामांमुळे या परिसरात आगीच्या मोठ्या घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कुदळवाडी परिसरातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. चिखली, मोशी, चऱ्होली हौसिंग सोसायटी फेडरेशनच्यावतीने रविवारी (दि. 26) दुपारी ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. कुदळवाडी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत भंगाराची गोदामे आहेत. या गोदामांना वारंवार आग लागण्याचे प्रकार घडतात. या आगीचा धूर बाजूला असलेल्या इमारतीमध्ये जातो. यामुळे नागरिकांना श्वास घेणेही कठीण होते. याबाबतचा मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला. त्यावर बोलताना हर्डीकर म्हणाले, कुदळवाडीतील अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची तयारी महापालिकेने केली होती. मात्र करोना आजाराची साथ आल्याने ही कारवाई काही काळाकरिता पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी काही पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मात्र करोनाचा धोका टळल्यावर योग्य तो पोलीस बंदोबस्त घेऊन येथील अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल. कुदळवाडी येथील भंगाराच्या गोदामात काम करणारे मजूर सायंकाळच्यावेळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येतात. तर काही जण खेळतातही. यामुळे या भागात करोनाचा मोठा प्रसार होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. तसेच या मजूरांवर कारवाई करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. याबाबत पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी संबंधित चिखली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना रस्त्यावर येणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले जातील, अशी माहिती दिली.