शहरातील एकूण रुग्णांपैकी 67 टक्के रुग्ण चाळिशीच्या आतील आठ लहान मुलांनाही लागण ः केवळ तीन ज्येष्ठांना बाधा पिंपरी – शहरामध्ये “करोना’ विषाणुचा संसर्ग झालेल्या 62 रुग्णांमध्ये सर्वाधिक संसर्ग हा तरुण वर्गाला झाल्याचे सोमवार सायंकाळपर्यंत (दि. 20) प्राप्त आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. 22 ते 39 वयोगटातील 28 जणांना या आजाराची आत्तापर्यंत लागण झाली आहे. ज्येष्ठांना या आजारामुळे सर्वाधिक धोका असताना केवळ 3 ज्येष्ठ नागरिकांनाच या आजाराची लागण झाली आहे. तसेच जागतिक आकडेवारीनुसार सुरुवातीला असे मानले जात होते की, लहान मुलांना “करोना’ची लागण कमी होते. परंतु पिंपरी-चिंचवड शहरात बारा वर्षांखालील आठ मुलांना “करोना’ची लागण झाल्याचे दिसून येत आहे. शहरामध्ये आजपर्यंत एकूण 62 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील 18 जणांना उपचार करून सोडण्यात आले आहे. तर, एकाचा मृत्यू झालेला आहे. बाधित रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामध्ये विशेषत: 22 ते 39 वयोगटातील 28 जणांचा समावेश आहे. त्या खालोखाल 40 ते 59 वयोगटातील 17 जण बाधित झालेले आहेत. तर, शून्य ते 12 या वगोगटात 8 रुग्ण आहेत. तर, 13 ते 21 वयोगटातील 6 रुग्णांचा समावेश आहे. 60 वर्षांपुढील ज्येष्ठांना या आजाराचा सर्वाधिक धोका असताना त्यांचे प्रमाण तुलनेत खुपच अत्यल्प आहे. केवळ 3 ज्येष्ठ नागरिकांनाच करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जमेची बाजू पिंपरी-चिंचवड शहरासाठी सर्वाधिक दिलासादायक बाब अशी की, शहरात सोमवार सायंकाळपर्यंत 62 जणांना करोनाची लागण झाली होती. परंतु मृत्यूचे प्रमाण केवळ 1.61 टक्के इतके आहे. शहरात “करोना’चा पहिला रुग्ण 12 मार्चला आढळला होता. गेल्या 40 दिवसांमध्ये शहरातील केवळ एक रुग्ण या आजाराने दगावला आहे. तर 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले. याचा अर्थ की सुमारे तीस टक्के रुग्णांनी “करोना’सोबतची लढाई जिंकली आहे. उर्वरित रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये ज्येष्ठांची संख्या नगण्य असल्याने मृत्यूचा दर खूपच कमी आहे. लागण झालेल्या रुग्णांमध्ये 39 पुरूष तर, 23 महिला रुग्ण आहेत. रुग्णांचा कसा वाढला आलेख शहरामध्ये 11 मार्चला सुरवातीला 3 करोनाचे बाधित रुग्ण आढळले होते. 18 मार्चपर्यंत हा आकडा 12 रुग्णांवर जाऊन स्थिरावला. 30 मार्चपर्यंत शहरात करोनाचे केवळ बाराच रुग्ण होते. त्यातील 10 रुग्ण उपचार होऊन घरी परतले होते. त्यामुळे शहर करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना दिल्ली-निजामुद्दीन येथे तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला शहरातील 33 नागरिकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आपोआपच करोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात परदेशातून आलेले नागरिक आणि त्यांच्या संपर्कातील नागरिकांमुळे शहरात करोनाबाधित रुग्ण सापडले. त्यानंतर तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या नागरिकांतून करोनाची लागण झाली. तर, सध्या पुण्यातील करोना बाधित नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या शहरातील नागरिकांना करोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा विविध कारणांमुळे शहरातील बाधित रुग्णांची संख्या सध्या 62 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे 27 तारखेपर्यंत शहराच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. वयोगट रुग्णांची संख्या टक्केवारी 0 ते 12 8 12.90 टक्के 13 ते 21 6 9.77 टक्के 22 ते 39 28 45.16 टक्के 40 ते 59 17 27.41 टक्के 60 हून अधिक 3 4.38 टक्के शहरात करोना बाधित रुग्णांमध्ये 22 ते 39 वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक 28 इतके आहे. ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण तुलनेत अत्यल्प म्हणजे तीनपर्यंतच आहेत. शहरातील वाढती रुग्णसंख्या आणि पुण्यात करोनाचा झालेला फैलाव पाहता पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमा 27 तारखेपर्यंत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. – संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त.