Top 10 News : प्रभात हा महाराष्ट्रातील आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. चला, जाणून घेऊया आज, दि. 24 एप्रिल 2026 रोजीच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी… १ – शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी व्हा.! राजू शेट्टी घेणार उद्धव ठाकरेंची भेट; शेतकरी प्रश्नावर मोठी राजकीय हालचाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज दुपारी 1 वाजता मुंबईतील ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीचा मुख्य मुद्दा कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हा आहे. गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस, गारपीट आणि हवामान बदलामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र अद्याप शासनाकडून नुकसानभरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ एकट्या पक्षाचा नाही तर संपूर्ण विरोधकांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणावा, असा प्रयत्न सुरू केला आहे. याआधी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक नसून शेतकरी प्रश्नावर मोठ्या राजकीय एकजुटीची शक्यता मानली जात आहे. २ – प्रतापगड घाटात मृत्यूचा सापळा.! 900 फूट दरीत दुचाकी कोसळली; रेस्क्यू टीमचा थरारक संघर्ष प्रतापगड घाटात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. मोहन चव्हाण आणि राजश्री चव्हाण (रा. वाई) हे दांपत्य दुचाकीवरून जात असताना वाहनाचा ताबा सुटला. आणि दुचाकी रस्त्याच्या कठड्याला धडकली आणि थेट सुमारे 900 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर स्थानिक बचाव पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. मुसळधार पावसामुळे आणि अत्यंत धोकादायक भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले आहे. एका मृतदेहाची सुटका करण्यात यश आले आहे, मात्र दुसरा मृतदेह दरीत अडकलेला आहे. या घटनेमुळे प्रतापगड घाटातील रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. पोलीस अधिकारी देखील या घटनेचा अधिक तपास करत आहेत. Top 10 News ३ – राज्यावर दुहेरी संकट ! पुढील काही तास धोक्याचे, पाऊस-उष्णतेचा जोरदार तडाखा महाराष्ट्रात सध्या हवामानाने दोन टोकांचे स्वरूप घेतले असल्याचं दिसून येत आहे. एका बाजूला कोकण आणि विदर्भात तीव्र उष्णतेची लाट असून हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि चिपळूण भागात अचानक मुसळधार पाऊस झाला असून काही ठिकाणी गारांचा मारा देखील झाला आहे. त्यामुळे पुढील 24 ते 48 तास हवामान अतिशय अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत अनावश्यक बाहेर जाणे टाळावे असे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असं देखील सांगितलं आहे. ४ – बारामती पोटनिवडणुकीतील मतदानाचा फायनल आकडा आला समोर ! अजितदादांच्या अपघाती निधनानंतर काल बारामती पोटनिवडणुकीत मतदान झाले. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान शांततेत पार पडले आहे. सुनेत्रा पवार यांच्याविरोधातील उमेदवारी काँग्रेसने मागे घेतली असली तरी 22 उमेदवार त्यांच्याविरोधात होते. मोठ्या पक्षाचा एकही उमेदवार त्यांच्याविरोधात नव्हता. काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, बारामती पोटनिवडणुकीत 50% मतदान झाले. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 50.74% मतदान झाले. आता दोन्ही उमेदवारांचे भाग्य हे मतपेटीत कैद झाले आहे. ही निवडणूक अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमुळे महत्त्वाची मानली जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात असून अंतिम निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर होणार आहे. (Top 10 News) बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या दोन लाखांपेक्षा अधिक लीडने निवडून येणार असा दावा करण्यात येत आहे. खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने सुनेत्रा पवार निवडून येतील असा दावा केला आहे. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा काकी या अडीच लाख मतांनी निवडून येतील असा दावा केला आहे. ५ – तामिळनाडूमध्ये कुठे किती मतदान झाले? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार दिली संपूर्ण माहिती… तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठीचे मतदान संपन्न झाले. यावेळी तामिळनाडूतील प्रत्येक मतदाराच्या चेहऱ्यावर निवडणुकीच्या उत्साह स्पष्टपणे दिसत होता. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी), ज्ञानेश कुमार यांनी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा पहिला टप्पा ही एक ऐतिहासिक निवडणूक असल्याचे म्हटले आहे. “स्वातंत्र्यानंतर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झाले आहे. निवडणूक आयोग बंगाल आणि तामिळनाडूतील प्रत्येक मतदाराला सलाम करतो. तामिळनाडूमध्ये ८४.६९ टक्के मतदारांनी मतदान केले, ज्यात ८३.५७ टक्के पुरुष, ८५.७६ टक्के महिला आणि ६०.४९ टक्के तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, तामिळनाडूच्या एकूण ५७.३ दशलक्ष मतदारांमध्ये २८ दशलक्ष पुरुष मतदार, २९.३ दशलक्ष महिला मतदार आणि ७,७२८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी, मतदान केंद्रांवरील ईव्हीएममधील बिघाडाच्या वृत्तांना निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, तामिळनाडूमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १७.६९ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत हा आकडा ३७.५६ टक्क्यांपर्यंत वाढला होता. तर दुपारी ३ वाजेपर्यंत तामिळनाडूतील ७० टक्के मतदारांनी मतदान केले होते आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८२.२४ टक्के मतदारांनी मतदान केले होते. ६ – एलपीजी सिलिंडरबाबत मोठी अपडेट आली समोर; नवीन गॅस कनेक्शन घेणं आता झालं कठीण मध्य पूर्वेत वाढत चाललेल्या तणावाचा थेट परिणाम आता भारतातील सामान्य नागरिकांवर दिसू लागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी नवीन घरगुती एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) कनेक्शन देणे तात्पुरते थांबवले आहे. सीएनबीसीच्या वृत्तानुसार, गॅस पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. भारत आपल्या एलपीजीच्या गरजेपैकी मोठा भाग आयातीवर अवलंबून आहे. देशात दरवर्षी सुमारे 33 दशलक्ष टन एलपीजीचा वापर होतो, त्यापैकी जवळपास 65% गॅस आयात केला जातो. यातील बहुतांश पुरवठा पश्चिम आशियाई देशांकडून येतो, त्यामुळे त्या भागातील अस्थिर परिस्थितीचा थेट परिणाम भारतावर होतो. या परिस्थितीत तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या प्राथमिकता ही विद्यमान ग्राहकांना नियमित एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर आहे. त्यामुळेच नवीन कनेक्शन देणे तात्पुरते थांबवण्यात आले आहे. यामुळे नवीन घरात स्थलांतर करणारे नागरिक तसेच पहिल्यांदाच एलपीजी कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या विषयी बोलताना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील संकट असूनही सरकारने एलपीजी, पेट्रोल, डिझेल आणि पीएनजीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागलेले नाही. असं सांगण्यात आलं आहे. ७ – डोनाल्ड ट्रम्प यांचा यू‑टर्न ! भारताबद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य घेतलं मागे, आता म्हणतात… ‘भारत एक महान देश’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका चर्चेत भारताबाबत वापरलेल्या ‘नरक’ (hellhole) शब्दामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यांनी भारत, चीन आणि इतर अनेक देशांना ‘नरक’ म्हटले होते. या वक्तव्यावर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त केला. यानंतर अमेरिकी दूतावासाने स्पष्टीकरण देत सांगितले की ट्रम्प यांनी भारताला एक “महान आणि अद्भुत देश” असेही म्हटले आहे. ‘नरक’ हे वक्तव्य वास्तविक पाहता एका पुराणमतवादी राजकीय टॉक शोच्या संभाषणाच्या प्रतीशी संबंधित आहे, जे स्वतः ट्रम्प यांनी शेअर केले होते. देशातील स्थलांतर धोरणावर आधारित हे विधान होते. तरीही ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अनेक भारतीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून, काँग्रेस पक्षाने याला भारताचा अपमान म्हणत तीव्र विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेकडे हा मुद्दा उपस्थित करावा, अशी मागणी पक्षाने केली. ८ – रिलायन्स जिओने क्रिकेट चाहत्यांसाठी लाँच केला एक धमाकेदार रिचार्ज प्लॅन ! रिलायन्स जिओने क्रिकेट चाहत्यांसाठी खास 149 रुपयांचा डेटा पॅक लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये 10GB हाय-स्पीड डेटा मिळतो. याची वैधता 30 दिवसांची आहे, मात्र अतिरिक्त फायदे 90 दिवसांपर्यंत मिळतात. यामध्ये JioHotstar मोबाइल सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे आयपील चे क्रिकेट सामने थेट पाहता येतात. हा प्लॅन केवळ डेटा पॅक असल्याने कॉलिंग आणि SMS सुविधा उपलब्ध नाहीत. क्रिकेट सीजनमध्ये लाईव्ह मॅच स्ट्रीमिंगसाठी हा प्लॅन खास आकर्षण ठरत आहे. ९ – फरदीन खानचा लाडक्या लेकीसोबत भन्नाट डान्स ! नेटकरी म्हणतात, ‘हा इंटरनेटवरील सर्वात गोड व्हिडीओ…’ बॉलिवूड अभिनेता फरदीन खान आणि त्याची मुलगी डियानी इसाबेला खान यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही आनंदाने नृत्य करताना दिसतात. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप भावला असून अनेकांनी तो “इंटरनेटवरील सर्वात गोड व्हिडिओ” असे म्हटले आहे. फरदीनने या व्हिडिओसोबत एक भावनिक संदेशही शेअर केला आहे. त्याने सांगितले की, मुलीसोबतचा पहिला डान्स क्षण हा प्रत्येक वडिलांसाठी अत्यंत खास असतो. मुलगी लहानपणापासून मोठी होताना पाहणे हा अनुभव अतिशय भावनिक असल्याचे त्याने म्हटले आहे. अभिनेता फरदीन खान हा 2000 च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता असून त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. आपल्या अभिनयासोबतच त्याच्या स्टाइलिश व्यक्तिमत्त्वासाठीही तो ओळखला जातो. काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर आता तो पुन्हा नव्या प्रोजेक्ट्ससह पुनरागमन करत आहे. १० – “हे स्थलांतर नाही, तर एक शांत निरोप आहे”… अभिनेत्री पूजा बॅनर्जींचा बंगालच्या परिस्थितीवर भावनिक सूर पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. मात्र या निवडणुकीसोबतच राज्यातील राजकीय वातावरण तणावपूर्ण असल्याचेही दिसून आले. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. या पार्श्वभूमीवर टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत राज्यातील परिस्थितीबाबत आपले मत मांडले आहे. पूजा बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधून होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतराबाबत चिंता व्यक्त केली. ‘हे स्थलांतर लोकांच्या इच्छेने होत नाही, तर नाईलाजाने घडत आहे. “हे स्थलांतर नाही, तर एक शांत निरोप आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानाने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. त्यांनी सांगितले की, बंगालमध्ये तरुणांसाठी पुरेशा नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक युवक राज्य सोडून इतर शहरांकडे वळत आहेत. “लोक तिथेच राहतात जिथे त्यांना संधी मिळते. जिथे संधी नसते, तिथून त्यांना जावे लागते,” असे त्यांनी नमूद केले. इतर शहरे आणि राज्ये झपाट्याने विकसित होत आहेत. तिथे नवीन उद्योग, रोजगाराच्या संधी आणि वाढत्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे युवक नैसर्गिकरित्या तिकडे आकर्षित होत आहेत. “एका पिढीला आपण किती काळ थांबायला सांगणार? किती काळ त्यांनी तडजोड करायची?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी बंगालच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची आठवण करून दिली. बंगालमधील युवकांना त्यांच्या स्वप्नांसाठी राज्य सोडावे लागत आहे, ही खूप दु:खद बाब आहे. “आम्ही जिथे जाऊ, तिथे बंगालला सोबत घेऊन जाऊ. पण आम्हाला आमच्या घरातून जावे लागू नये, अशी परिस्थिती निर्माण व्हावी,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.