Cargo Ship Fire : मध्यपूर्वेतील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ मोठी सागरी दुर्घटना घडली असून एका मालवाहू जहाजाला भीषण आग लागल्यानंतर ते उलटल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून इतर चार भारतीय कर्मचारी जखमी झाले आहेत. जहाजावर एकूण १८ भारतीय कर्मचारी कार्यरत होते. या घटनेमुळे भारतीय खलाशी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर जवळून जात असलेल्या दुसऱ्या एका जहाजाने तात्काळ मदतकार्य सुरू केले. या जहाजाच्या मदतीने १७ भारतीय कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. जखमी खलाशांना उपचारासाठी दुबई येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. लाकडी मालवाहू होडीद्वारे सामान्य मालाची वाहतूक केली जात होती. अचानक लागलेल्या आगीमुळे जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि काही वेळातच जहाज उलटल्याची माहिती समोर आली. ही घटना ज्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ घडली, तो भाग जागतिक स्तरावर अत्यंत संवेदनशील मानला जातो. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल वाहतूक या मार्गाने केली जाते. त्यामुळे या भागात घडणारी कोणतीही घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर मानली जाते. दरम्यान, याच परिसरात एका चिनी तेलवाहू जहाजालाही आग लागल्याची घटना समोर आली आहे. चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, JV Innovation नावाच्या तेल आणि रासायनिक टँकरवर अचानक हल्ल्यासदृश परिस्थिती निर्माण झाली. हे जहाज मार्शल बेटांच्या ध्वजाखाली चालणारे असून अंदाजे १७३ मीटर लांबीचे आहे. २००४ साली बांधण्यात आलेल्या या जहाजाने सोमवारी आसपासच्या जहाजांना आपत्कालीन संदेश पाठवत डेकवर आग लागल्याची माहिती दिली होती. जहाजाचे मुख्य अभियंता लिऊ यांनी सांगितले की, आग किंवा हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा अपघात होता की हेतुपुरस्सर हल्ला, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. त्या वेळी जहाज स्थिर स्थितीत असल्याने कोणत्याही संकटाची कल्पनाही नव्हती, असे त्यांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या टँकरमध्ये एकूण २२ कर्मचारी होते, त्यात १० हून अधिक चिनी नागरिकांचा समावेश होता.