इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात नवविवाहित दाम्पत्याबरोबर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत रविवारी हा स्फोट झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्लामाबादेतल्या जी-७/२ या ठिकाणी सुरू असलेल्या विवाह समारंभात झाला. या स्फोटात एकूण ८ जण ठार झाले आणि अन्य ११ जण जखमी झाले, असे बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले. बचाव कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून अन्य १९ जणांना बाहेर काढले आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने वैद्यकीय आणीबाणीची स्थितीची घोषणा करण्यात आली आहे, असे पाकिस्तान इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्रवक्ते डॉ. अनिझा जलिल यांनी सांगितले. या स्फोटामुळे किमान ४ घरांचे नुकसान झाले. स्फोटामुळे नुकताच विवाह झालेले वधू आणि वर देखील मरण पावले आहेत, स्फोट झाल्याने संपूर्ण घर कोसळले. यावेळी डझनभर पाहुणे देखील उपस्थित होते, असे इस्लामाबादचे अतिरिक्त उपायुक्त साहिबजादा युसुफ यांनी माध्यमांना सांगितले. गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊ लागल्यामुळे या सिलिंडचा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हिवाळ्यामध्ये घरात उबदार वातावरण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक गॅसचा वापर केला जातो. अशावेळी गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याच्या घटनांमध्ये सर्वसाधारणपणे वाढ होते.