Accident News : एस कॉर्नरवर काळाचा घाला; ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Accident News : या घटनेची माहिती मिळताच नेवासे फाटा येथील शिवमुद्रा रुग्णवाहिकेचे चालक विकास निपुंगे यांनी तत्परता दाखवत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने जखमी चव्हाण यांना तात्काळ नेवासे फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.

नेवासा : श्रीरामपूर राज्य मार्गावरील एस कॉर्नर येथे बुधवारी (दि.७) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की,रात्रीच्या सुमारास अशोक गोवर्धन चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असतांना एस कॉर्नर येथे उसाने भरलेला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीस्वराने जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की दुचाकीने धडक दिल्यानंतर जागीच पेट घेतला.
या घटनेची माहिती मिळताच नेवासे फाटा येथील शिवमुद्रा रुग्णवाहिकेचे चालक विकास निपुंगे यांनी तत्परता दाखवत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने जखमी चव्हाण यांना तात्काळ नेवासे फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.त्यानंतर मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
रिफ्लेक्टरचा अभाव ठरतोय मृत्यूचा सापळा
अनेक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींना मागे रेडियम, रिफ्लेक्टर किंवा लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी असे उसाने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली वाहने लवकर दिसून येत नाहीत. त्यामुळे असे अनेक भीषण अपघात होत असतात या अपघाताचेही तेच मुख्य कारण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी यावेळी बोलतांना सांगितले. या प्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात उशिराने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. मयत अशोक चव्हाण यांच्या झालेल्या निधनाने साईनाथनगर व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





