Nevasa Crime – नेवासा तालुक्यातील घोडेगाव शिवारातील मारमोडी पुलाजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. गायींची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने एका आयशर टेम्पोचा पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला टेम्पो चालकाने जाणीवपूर्वक धडक देत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही तरुण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत सोमनाथ हराळे (वय २८, रा. चांदा, ता. नेवासा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी संकेत हराळे व त्यांचा मित्र सार्थक केळगेंद्रे हे दोघे ८ मार्च रोजी रात्री सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मोटारसायकल (क्रमांक MH 17 CS 7274) वरून घोडेगाव परिसरातून जात होते. यावेळी त्यांना आयशर टेम्पो ( GJ 23 AT 9272) मध्ये गायींची वाहतूक होत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी त्या टेम्पोचा पाठलाग केला. काही अंतरावर जाऊन त्यांनी टेम्पोला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, टेम्पोवरील अज्ञात चालकाने जाणीवपूर्वक वेगाने टेम्पो चालवत त्यांच्या मोटारसायकलला मागील बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोघेही तरुण मोटारसायकलसह रस्त्याच्या कडेला फेकले गेले. या अपघातात फिर्यादी संकेत हराळे यांच्या चेहऱ्यावर व शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या. त्यांच्यामागे बसलेला मित्र सार्थक केळगेन्द्रे यांच्या दोन्ही पायांवर गंभीर मार बसल्याने तेही जखमी झाले. घटना घडल्यानंतर टेम्पो चालकाने थांबण्याऐवजी घटनास्थळावरून चांदा गावाच्या दिशेने वेगाने पळ काढला. जखमींना तातडीने उपचारासाठी प्रथम स्थानिक ठिकाणी हलविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन आयशर टेम्पो (GJ 23 AT 9272) असल्याचे निष्पन्न झाले.त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे.