Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ आगामी सात वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात १० लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहेत. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये ही माहिती दिली. भारताला एआय क्षेत्रात स्वावलंबी बनवणे आणि हे प्रगत तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वस्त आणि सहज उपलब्ध करून देणे, हा या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश आहे. डेटा क्रांतीनंतर आता ‘इंटेलिजन्स’ क्रांती – मुकेश अंबानी यांच्या मते, ज्याप्रमाणे जिओने भारतात इंटरनेट डेटाचे दर अत्यंत कमी करून डिजिटल क्रांती घडवली, त्याचप्रमाणे आता एआयच्या सेवांचे दरही मोठ्या प्रमाणात कमी करण्यात येतील. त्यांनी एआयची तुलना ‘अक्षय पात्र’शी केली असून, हे तंत्रज्ञान ज्ञान आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी कधीही न संपणाऱ्या स्रोतासारखे काम करेल, असे सांगितले. ही गुंतवणूक केवळ तात्पुरत्या फायद्यासाठी नसून देशाच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पायाभूत सुविधा आणि जामनगरमधील प्रकल्प – या मोहिमेअंतर्गत ‘जिओ इंटेलिजन्स’ नावाची शाखा स्थापन करण्यात आली आहे. रिलायन्स सध्या जामनगरमध्ये मोठ्या आकाराची एआय-सज्ज डेटा सेंटर्स उभारत आहे. २०२६ च्या शेवटच्या सहा महिन्यांपर्यंत यातील १२० मेगावॅट क्षमतेचा भाग सुरू होईल. विशेष म्हणजे, या केंद्रांना लागणारी वीज रिलायन्सच्या स्वतःच्या १० गिगावाट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांमधून दिली जाणार आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच वीज खर्चातही बचत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. हेही वाचा – ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाकडून जागतिक आयात शुल्क रद्द पाच मुख्य तत्त्वे आणि रोजगाराची संधी – जिओ इंटेलिजन्सचे काम पाच प्रमुख तत्त्वांवर आधारित असेल. यामध्ये केवळ इंग्रजीच नाही तर सर्व भारतीय भाषांमध्ये एआय सेवा देणे, ही प्राथमिकता आहे. एआयमुळे नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त केली जात असली, तरी अंबानी यांनी असा विश्वास दिला की या तंत्रज्ञानामुळे नवीन आणि उच्च-कौशल्याच्या कामाच्या संधी निर्माण होतील. तसेच, शेती, छोटे व्यावसायिक आणि असंघटित क्षेत्रातील लोकांनाही एआयचा फायदा मिळावा, यासाठी कंपनी प्रयत्नशील राहील. भारताची जागतिक भूमिका – भारत जगातील एक मोठी एआय शक्ती म्हणून उदयाला येईल, असा दावाही यावेळी करण्यात आला. भारताकडे असलेली मोठी लोकसंख्या, लोकशाही आणि सध्याची डिजिटल व्यवस्था ही आपली जमेची बाजू आहे. रिलायन्स केवळ परदेशी तंत्रज्ञानाची आयात न करता, जागतिक कंपन्यांसोबत भागीदारी करून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देणार आहे. डेटाची सुरक्षितता आणि विश्वासार्हता ही जिओची मुख्य जबाबदारी असेल, असेही त्यांनी नमूद केले.