Housing Projects : बांधकाम क्षेत्र नियंत्रक महारेराने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मार्च महिन्यामध्ये एकूण 1,060 गृह प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. याच महिन्यात गुढीपाडवा येतो. त्यामुळे या महिन्यात जास्त प्रकल्पांनी मागणी केलेली असते. या आकडेवारीत 148 दुरुस्त प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. तर प्रकल्प विस्तारीकरणाच्या 426 प्रस्तावांना महारेराकडून मंजुरी देण्यात आली. महारेरा महाराष्ट्रात वर्षाला सर्वसाधारणपणे 4,500 प्रकल्पांना मंजुरी देते. गुढीपाडवा ज्या महिन्यात येतो त्या महिन्यामध्ये जास्त प्रकल्पांना मंजुरी मागितली जाते. गुढीपाडव्याच्या सुमारास खरेदी शुभ मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी तब्बल 211 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या दिवशी महारेरातील कर्मचार्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त केले. मुंबई महानगर विभागात 607 प्रकल्पांना, पुणे विभागात 321 प्रकल्पांना, खानदेश विभागात 63 प्रकल्पांना, विदर्भ विभागात 50 प्रकल्पांना, तर मराठवाडा विभागात 14 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. जिल्हा पातळीवर पुणे जिल्हा आघाडीवर राहिला, या जिल्ह्यातील 286 प्रकल्पांना मार्च महिन्यामध्ये परवानगी देण्यात आली, मुंबई उपनगर विभागात 196 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. ठाणे जिल्ह्यात 185 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. रायगड जिल्ह्यातील 110 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गृह बांधणी क्षेत्राची वाढ योग्य वेगाने होत असल्याचे या प्रकल्प मंजुरीवरून दिसून येते. मात्र आखाती युद्धामुळे आता विविध वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रावर लघु ते मध्यम पल्ल्यात काही प्रमाणात नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई शहरामध्ये जास्त प्रमाणात गृहनिर्मिती प्रकल्प उभारले जातात. सध्या तरी घरासाठीच्या कच्च्या मालाच्या किमती फारश्या वाढलेल्या नाहीत. मात्र आगामी काळात त्या वाढण्याची शक्यता आहे. एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने रेडी रेकनर दर जैसे थे पातळीवर ठेवले आहेत.