तरुण वयातील गुंतवणुकीचे महत्त्व (भाग-१)

महाविद्यालयीन शिक्षण संपले, नोकरी-व्यवसायाला सुरवात झाली की, पैसे हातात खेळू लागतात. मग स्वाभाविकपणे अनेक दिवसांच्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च होऊ लागतात. नवा मोबाईल, भारीतली बाईक, ब्रँडेड कपडे, हॉटेलिंग इत्यादी. हे सगळे स्वाभाविक असले तरी अगदी पहिल्या कमाईपासून कमाईतील किमान वीस टक्के रक्कम दरमहा बचत करून तिचे गुंतवणुकीत रुपांतर करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. तारुण्यात व्यक्ती तुलनेत निर्धास्त आणि तणावरहित जीवन जगत असते. आयुष्यभर असेच जगायचे असेल तर कमाईतील किमान वीस टक्के गुंतवणुकीचा नियम लगेचच अंमलात आणला पाहिजे.

प्रत्यक्षात काय होते? तारुण्य म्हणजे मौजमजा, मस्ती आणि आपल्याच धुंदीत जगायचे अशी प्रत्येकाची कल्पना असते. त्यात गैर नसले तरी किमान काही गोष्टींचे भान असणे आवश्यक असते आणि त्यामध्ये गुंतवणुकीचा अतिशय वरचा क्रम लागतो. कष्ट करून पैसा कमावणे आणि रोजच्या गरजा, मौजमजा याबरोबरच काही रक्कम भविष्यासाठी गुंतवणे गरजेचे असते. त्यासाठी तरुण वयात सुरवात करणे सगळ्याच दृष्टीने अतिशय लाभदायक ठरते.

शेवटी माणसाच्या बहुतेक सगळ्या गोष्टी भावनांशी निगडीत असतात. अगदी तर्कसंगत निर्णयदेखील भावनांना केंद्रित ठेवून घेतले जातात. त्यामुळेच भावनेच्या भरात तरुण पिढीक़डून पाहिजे तसा खर्च केला जातो. जमा-खर्च लिहिण्याची सवय नसणे, एकूण कमाईतील किती पैसे कशावर खर्च करायचे याचे नियोजन नसणे यातून अनेक चुका होत जातात. तरुण पिढीने पैशांबाबत विशीमध्ये होणाऱ्या चुका टाळल्या तर नंतरच्या आयुष्यात त्यांच्यावर पस्तावण्याची वेळ येणार नाही. किंबहुना हाती पैसा आणि आर्थिक स्वातंत्र्य असले की दिमाखात जगता येते. त्यासाठी बचत आणि गुंतवणुकीची नियोजन विशीतच सुरु केले पाहिजे. आयुष्यात वेळेचा सदुपयोग आणि गुंतवणुकीचे योग्य व्यवस्थानप केले तर आयुष्यात आर्थिक कारणावरून कधीही पस्तावण्याची पाळी येत नाही.

तरुण वयातील गुंतवणुकीचे महत्त्व (भाग-२)

तरुणाईच्या खर्चाची कारणे

खर्च केला की आनंदी वाटते आणि बरे वाटते म्हणून अनेकजण भरपूर आणि अनावश्यक खर्च करत असल्याचे दिसते. पण आनंदी वाटण्यासाठी अनावश्यक खर्च करत राहणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. अशा प्रकारे जास्त दिवस वागता येत नाही. त्यामुळे आपला आजचा दिवसच खराब आहे असे वाटत असेल तर  खरेदीसाठी अजिबात जाऊ नका. तुमच्या तात्पुरत्या आनंदासाठी अनावश्यक खर्च करणे योग्य नाही. काही वेळाने तुमच्या भावना स्थिर होतील, तुमचे मन आनंदी होईल आणि त्याचबरोबर तुमच्याकडून पैशांची बचतही झालेली असेल. एवढेच नाही तर भविष्यात ही बचत योग्य ठिकाणी गुंतवल्यानंतर त्यातून तुम्हांला दीर्घकाळासाठी आनंद मिळणार असतो.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)