तरुण वयातील गुंतवणुकीचे महत्त्व (भाग-२)

तरुण वयातील गुंतवणुकीचे महत्त्व (भाग-१)

आव्हाने स्वीकारण्यासाठी आर्थिक पाठबळ

सध्याच्या तरुण पिढीचा संघर्ष वेगळ्या पद्धतीचा. त्याला हरघडी, रोज, बारा महिने चोवीस तास संघर्ष करावा लागतो. प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध करून दाखवायचे असते. अशा स्थितीत नवी आव्हाने, नव्या क्षेत्रातील करिअर, नवी नोकरी  अशा संधी साधायच्या असतील तर स्थित्यंतराच्या काळातील परिस्थिती निभावून न्यायची असेल तर हाती काही रक्कम असावी लागते. ज्यांची आधीची पिढी शहरात स्थिरस्थावर झाली आहे त्यांचा संघर्ष तुलनेत कमी असतो. पण साधारणपणे तरुण वयात राहण्याचे भाडे, मेसचा खर्च, सहा महिन्यातून एकदा कपड्यांची खरेदी, मोबाईल, पेट्रोल असा ठराविक खर्च असतो. त्यानंतर नोकरी करणाऱ्या तरुणाच्या हाती बऱ्यापैकी रक्कम शिल्लक राहते. ती नीट गुंतवली तर मग करिअरमध्ये नव्या संधीला सामोरे जाताना आर्थिक ताण रहात नाही. त्यामुळेच गुंतवणूक करताना भविष्यातील अडचणींसाठी किमान सहा महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम राखून (राखीव निधी) ठेवावी.

गुंतवणुकीबाबतची सजगता

तरुण असताना गुंतवणुकीचे महत्त्व कळत नाही. किंबहुना मला इतक्यात गुंतवणुकीची काय गरज आहे, अशा प्रकारची वृत्ती असते. कोणत्याही गुंतवणुकीत चक्रवाढीचा फायदा अतिशय महत्त्वाचा असतो. तुम्ही तेवीस-चोवीसाव्या वर्षी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे खाते काढून दरमहा गुंतवणूक करत राहिलात आणि प्रसंगी त्यात वाढ करत राहिलात तर पंधरा वर्षात म्हणजेच तुमच्या चाळीसाव्या वर्षी तुमच्या खात्यात अभिमान वाटावा अशी रक्कम जमा झालेली असेल ती चक्रवाढीच्या फायद्यामुळे. असाच फायदा म्युच्युअल फंडांच्या योग्य योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास होतो. आता या सगळ्या गोष्टींसाठी ज्या औपचारिक गोष्टींची पूर्तता करावी लागते ( उदा. पीपीएफचे खाते काढणे, केवायसी) या गोष्टी अतिशय सोप्या झाल्या आहेत. या गोष्टी आता ऑनलाईन करता येत असल्याने स्मार्टफोन वापरणाऱ्या तरुण पिढीसाठी तर ते काम बसल्याजागेवर करण्यासारखे असते. फक्त यासाठी तुम्हांला थोडं पुश करणारं आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत नेमकं काय दडलेलं आहे हे योग्य पद्धतीने दाखवणारा कुणीतरी लागतो. ही सगळी माहिती तसेच जोखीम व परताव्याची नीट माहिती आर्थिक सल्लागारांकडून मिळू शकते.

धोक्यांपासून लांब रहा

माणसाला सगळे काही झटपट व्हावे असे वाटत असते. सध्याच्या इन्स्टंट जमान्यात तर केलेलीगुंतवणूक रोज किती वाढली किंवा कमी झाली, हे बघत बसण्याची सवय अनेकांना असते. माणसामध्ये असणारी ही हाव हेरून अनेकजण मोठ्या अमिषाच्या जाळ्यात अडकून फसवणूक करत असल्याच्या घटना रोज उघडकीस येतात. विशेषतः तरुणांना वर्क फ्रॉम होम, एमएलएम असल्या बोगस कल्पनांमध्ये मोठे घबाड मिळण्याचे अमिष दाखवून फसवणूक केली जाते. असल्या कंपन्या, चिटफंड, मल्टीस्टेट सोसायट्या, एमएलएम यांच्या नादी कधीही लागू नये. हे सगळे प्रकार शेवटी गुंतवणूदारांना देशोधडीला लावणारे असतात.

तरुण वयातच योग्य ठिकाणी बचत आणि बचतीतून गुंतवणुकीला सुरवात केल्यास आयुष्यभर आनंदी आणि समाधानी राहता येते. अन्यथा जसजसे वय वाढत जाते तसतशा जबाबदाऱ्या आणि खर्च वाढत जातो. त्यामुळे आर्थिक आघाडीवर आयुष्याची वाटचाल आनंदाने होण्यासाठी तरुण वयातच गुंतवणुकीला प्रारंभ करणे  आवश्यक असते. कारण पैसा आहे तर सर्व काही आहे, असे जे म्हटले जाते, ते बऱ्याच प्रमाणात खरेच आहे.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)