Election News – केरळच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्या निर्णयाचा चेंडू पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कोर्टात गेल्याचे स्पष्ट होत आहे. केरळमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये दोन-तृतीयांश बहुमत मिळवत कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने (यूडीएफ) बाजी मारली. सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसकडे केरळमधील नव्या सरकारचे नेतृत्व जाणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्या पक्षाने मुख्यमंत्री निवडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, प्रबळ दावेदारांमुळे त्या निवडीची प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर उभे ठाकले आहे. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून रमेश चेन्निथला, के.सी.वेणुगोपाल आणि व्ही.डी.सतीशन यांची नावे आघाडीवर आहेत. केरळमधील कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची गुरूवारी बैठक झाली. त्यावेळी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून मुकूल वासनिक आणि अजय माकन उपस्थित राहिले. त्यांनी आमदारांची मतं जाणून पुन्हा दिल्ली गाठली. तसेच, आपला अहवाल खर्गे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी खर्गे यांनी शनिवारी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक बोलावली. त्यामध्ये राहुल, केरळमधील प्रमुख नेते आणि मुख्यमंत्रिपदाचे तिन्ही दावेदार सहभागी झाले. सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत सरकार स्थापनेविषयी चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत थेट कुठला निर्णय घेण्यात आला नाही. कॉंग्रेसच्या बैठकीनंतर पक्षाच्या केरळ प्रभारी दीपा दासमुन्शी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री पदाविषयी अंतिम निर्णय घेण्याचे सर्वांधिकार आमदारांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहेत. त्यानुसार, खर्गे आणि राहुल अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी नमूद केले. केरळमधील मावळत्या विधानसभेची मुदत २३ मे यादिवशी समाप्त होईल. त्याआधी आणि लवकरच निर्णय होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.