२८६ ग्रामपंचायतींना सुमारे ९० कोटी मुद्रांकाची रक्कम अदा
पुणे – पुणे जिल्हा परिषदेला मिळणारे मुद्रांक शुल्कासह अन्य निधींची सुमारे 355 कोटी रुपयांची रक्कम राज्य शासनाकडे थकीत आहे. ही रक्कम मिळत नसल्याने याचा परिणाम जिल्ह्यातील विकासकामांवर होऊ लागला आहे. ही रक्कम लवकर मिळण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या 6 डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेच ेमुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेडगे तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी हा थकीत निधीवर चर्चा करण्यात आली.
राज्य सरकारकडे पुणे जिल्हा परिषदेची एकूण थकीत रक्कम अधिक आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा मुद्रांकाच्या रकमेचा आहे. मुद्रांकाची रक्कम गेल्या वर्षापासून चालू वर्षाची रक्कम बाकी आहे. एकूण मुद्रांकापोटी राज्य सरकारने सुमारे 147 कोटी रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेला सुपूर्द केली आहे.
त्यामुळे आजमितीला राज्य सरकारकडून मुद्रांकासह पाणीपट्टी, सापेक्ष अनुदान यासारख्या विविध गोष्टींसाठीची 355 कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे थकीत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील 286 ग्रामपंचायतींना सुमारे 90 कोटी रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेने मुद्रांकाची रक्कम म्हणून देऊ केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली.