पुणे – जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी कोणाची वर्णी लागणार कोणत्या वरिष्ठ नेत्याचे पारडे जड राहणार याबाबत जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांसह सदस्यांनी “फिल्डिंग’ लावली असून दिवसाआड सदस्यांची मुंबईवारी सुरू झाली आहे.
येत्या आठ दिवसांत गटनेतेपदाचे नाव जाहीर होणार आहे. मात्र, जिल्हा परिषदेत विकासासाठी झटणाऱ्या सदस्याची वर्णी लागणार की वरिष्ठ नेत्यांच्या कृपाआशिर्वादामुळे गटनेतेपदी वर्णी लागणार? याची शिवसैनिकांमध्ये रंगली आहे.
शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके यांची पक्षाविरोधी कारवायाबद्दल त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी शिवसेनेच्या 13 सदस्यांपैकी 4 जणांनी इच्छुकता दर्शवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
देविदास दरेकर, बाबाजी काळे, शलाका कोंडे, माऊली कटके, शालिनी पवार, सागर काटकर, गुलाब पारखे, देवराम लांडे, दिलीप यादव, तनुजा घनवट, रूपाली कड, ज्योती झेंडे, आणि शैलजा खंडागळे हे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यामध्ये माजी खासदार व उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचे समर्थक देविदास दरेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे समर्थक असलेले दिलीप यादव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्यासह शलाका कोंडे हे सदस्य गटनेतेपदासाठी इच्छुक आहे.