नियुक्तीसाठी नवीन वर्ष उजाडण्याची चिन्हे
पुणे – राज्यात महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा झाला. आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे वेध सर्व सदस्यांना लागले आहेत. मात्र, सत्ता स्थापनेनंतर मंत्र्यांचे खातेवाटप, त्यानंतर लगेचच दोन आठवड्यांत होणारे हिवाळी अधिवेशन, या सगळ्या घाईगडबडीत दि.21 डिसेंबरला होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुका देखील पुढे ढकलण्याचा हालचाली सुरू आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही निवड होणार असे दिसते.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची टर्म संपून निवडणुका घ्याव्या लागणार असल्याने यापूर्वीच्या भाजप सरकारने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना 120 दिवसांची मुदतवाढ दिली होती. ती दि.21 डिसेंबरला संपुष्टात येत असून नव्याने निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे.
राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने सत्ता स्थापनेनंतर तातडीने काही वैधानिक प्रक्रिया सरकारला पूर्ण करावयाची आहे. सरकारवरील विश्वासदर्शक ठरावानंतर विधानसभा अध्यक्ष निवड, राज्यपालांचे अभिभाषण त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांचे खातेवाटप ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यास दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर लगेच दि.16 डिसेंबरच्यादरम्यान विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन घेण्याचे देखील नियोजन आहे.
यादरम्यानच जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका होत असल्याने मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना अधिवेशन सोडून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची राजकीय गणिते जुळवण्यासाठी पळावे लागेल. म्हणून किमान दहा-पंधरा दिवसांसाठी मुदतवाढी प्रस्ताव पुढे आला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका घ्याव्यात यासाठी ग्रामविकास विभागाकडून प्रस्ताव मागवला जाणार असल्याची चर्चा आहे.