कार्यकाल संपत आल्याने झेडपीत पदाधिकाऱ्यांची धावपळ

प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न : विशेष सभेचेही आयोजन
संतोष पवार
सातारा – सातारा जिल्हा परिषदेचा कार्यकाल डिसेंबर अखेर संपत असल्याने विद्यमान पदाधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे. एरवी कधी तरी दिसणारे पदाधिकारी आता जिल्हा परिषदेत रोज दिसत असून आपल्या विभागातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कार्यकाल पूर्ण होण्याअगोदरच 20 डिसेंबरला विशेष सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असून पहिल्या अडीच वर्षांपासून अध्यक्ष म्हणून संजीवराजे नाईक निंबाळकर यांना संधी मिळाली. उपाध्यक्षपदी आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापतीपदी विक्रमसिंह पाटणकर यांचे समर्थक राजेश पवार, कृषी सभापती आ. मकरंद पाटील यांचे समर्थक मनोज पवार, समाजकल्याण सभापतीपदी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे समर्थक शिवाजी सर्वगौड, महिला व बालकल्याण सभापतीपदी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थक वनिता गोरे यांना संधी देण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात अध्यक्ष संजीवराजे यांनी सर्व पदाधिकारी, सदस्यांना विश्‍वासात घेवून प्रशासनाला बरोबर घेवून स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची मुदत 21 सप्टेंबर रोजी संपली होती. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे तीन महिने मुदतवाढ देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर काही महिन्यातच पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने विकासकामांवर विपरित परिणाम झाला होता. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सर्वसाधारण सभेत अनेक विषय मार्गी लावण्यात यश आले होते. मात्र अनेक विषय प्रलंबित होते. पदाधिकाऱ्यांचा कालावधी डिसेंबर अखेर संपणार असल्याने पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. अनेक पदाधिकारी दिवस दिवस जिल्हा परिषदेत थांबून विकासकामे मार्गी लावत होते.

दरम्यान, आचारसंहितेच्या बडग्यात अडकलेली अनेक कामे मार्गी लागली असली तरी विविध विभागांच्या विकास आराखड्यांचा विषय प्रलंबित होता. हा आराखडा मंजूर करुन जिल्हा नियोजन समितीकडे वेळेत गेला तर अनेक कामे मार्गी लागणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेची विशेष सभा 20 डिसेंबर रोजी बोलावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वय राखण्यात अध्यक्ष संजीवराजे यांना यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या योजना प्रभावीपणे राबवून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांचे अभ्यास दौरेही उरकण्यात येत आहेत. साधारणत: महिन्याचा कालावधी राहिला असताना शेवटच्या दिवसात मात्र पदाधिकाऱ्यांनी चांगलाच जोर लावला आहे. अधिकारीपण गतीने काम करताना दिसत आहेत. एकंदर जनतेला अभिप्रेत असा विकास होताना दिसत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

झेडपीत महाविकास आघाडी?
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्या धर्तीवर जिल्हा परिषदेत कार्यवाही झाल्यास शिवसेना व राष्ट्रीय कॉंग्रेसलाही सत्तेत सहभाग मिळण्याची शक्‍यता आहे. याबाबत अद्याप कोणी प्रतिक्रिया दिली नसली तरी तशा घडामोडी घडवून एक वेगळा आदर्श सातारा जिल्ह्यात प्रस्थापित करुन भाजपाला शह देण्याचा प्रयत्न होवू शकतो, असेही बोलले जात आहे.

नवीन पदाधिकारी निवडीचे वेध
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या पदासाठी जोरदार रस्सीखेच आहे. विद्यमान अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, मानसिंगराव जगदाळे, राजेश पवार, सुरेंद्र गुदगे यांची नावे अग्रस्थानी आहेत. अध्यक्ष व पदाधिकारी निवडताना समतोल साधून निवडी करण्यात येणार आहेत. गत निवडणुकीत प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय झालेले मतदान याचीही पडताळणी होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपद कोणाला मिळणार? पदाधिकारी कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.