सातारा, – गाव हा देशाच्या विकासातील एक महत्वाचा घटक असून गावाच्या विकासात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका असते. ग्रामपंचायतींमार्फत विविध योजना व अभियानांची अंमलबजावणी करताना त्यामधील तरतुदींचे परीपूर्ण ज्ञान सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना असणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दीड हजार ग्रामपंचायतींच्या साडेचार हजार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.सातारा जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींनी शाश्वत विकासाची ध्येये साध्य करण्यासाठी या पंचायती राज संस्थांना बळकट करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्हयातील १५०० ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी दि. २ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरावर एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात येत आहेत.
सातारा, कोरेगाव व जावळी तालुक्याची कार्यशाळा सोमवारी सातारा येथे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. मंगळवारी (दि.३) माण, खटाव तालुक्याची कार्यशाळा खटाव येथे होणार आहे. बुधवारी (दि. ४)कराड तालुक्याची कार्यशाळा कराड येथे, गुरुवारी (दि.५) महाबळेश्वर, वाइ तालुक्याची कार्यशाळा वाइ येथे, दि. १० डिसेंबर रोजी फलटण, खंडाळा तालुक्याची कार्यशाळा फलटण येथे तर दि. १२ डिसेंबर रोजी पाटण तालुक्याची कार्यशाळा पाटण येथे होणार असल्याची माहिती याशनी नागराजन यांनी दिली.विविध योजना व अभियानांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच इतर मान्यवर यांच्या अनुभवांची देवाण-घेवाणही सुसंवादाव्दारे या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेचा ग्रामपंचायतींना त्यांची शाश्वत विकासाची ध्येये साध्य करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन, उपलब्ध संसाधनाचा सुयोग्य वापर व अंमलबजावणी करण्यामध्ये महत्वपूर्ण उपयोग होणार आहे. या तालुकास्तरीय कार्यशाळांना जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंचांनी उपस्थित राहावे, असे आवाहन याशनी नागराजन यांनी केले आहे.