आंबेगाव, मावळ, भोर, वेल्हा, मुळशी, खेडमधून इच्छुकांची फिल्डिंग
पुणे – जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचे वेध इच्छुक महिला सदस्यांना लागले असून, अवघ्या पंधरा दिवसात नवीन महिला अध्यक्षा विराजमान होणार आहेत. यावेळी अध्यक्षपादाचा बहुमान उत्तर विभागाला मिळणार हे निश्चित आहे. परंतू अध्यक्षपदासाठी कोणत्या तालुक्याचे पारडे जड राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये आंबेगाव, मावळ, शिरूर आणि हवेली तालुक्यातील सदस्यांची नावे जोर धरत आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (महिला) वर्गासाठी आरक्षीत झाले आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षे महिला अध्यक्षा जिल्ह्याचा कारभार चालविणार आहे. दरम्यान, पहिले अडीच (21 मार्च 2017 ते 21 डिसेंबर 2019 ) वर्षे नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी अध्यक्षपद आरक्षित होते. त्यामुळे अध्यक्षपदाचा बहुमान दक्षिण विभागातील बारामतीला मिळाला. विश्वासराव देवकाते यांनी अध्यक्ष पदावर राहून जिल्हा परिषदेच्या विकासाला गती देण्याचे काम केले.
आता पुढील अडीच वर्षासाठीचे अध्यक्षपद उत्तर विभागाला देणार हे निश्चित आहे. उत्तर विभागामध्ये आंबेगाव, मावळ, भोर, वेल्हा, मुळशी, खेड आणि जुन्नर या सात तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील तुलसी भोर, अरूणा थोरात, मावळ तालुक्यातील शोभा कदम, शिरूर तालुक्यामधील स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, कुसुम मांढरे, सुजाता पवार, हवेली तालुक्यातील किर्ती कांचन, अर्चना कामठे, अनिता इंगळे, पुजा पारगे तर खेड तालुक्यातून निर्मला पानसरे इच्छुक आहेत.
आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, आरक्षण जाहीर झाल्यापासून महिला सदस्यांसह त्यांचे पतीदेव पायाला भिंगरी लावून नेत्यांच्या गाठी-भेठी घेत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमात पक्षप्रमुख शरद पवार यांनी महिला सदस्या कोठेही कमी नसून, उच्चशिक्षित महिला अध्यक्षस्थानी असाव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. आज महिला सदस्याला अध्यक्षपदाचा हा बहुमान देताना उच्चशिक्षित, अनुभवी का? नवख्या महिला सदस्यांना संधी देणार हे येत्या 22 डिसेंबरला स्पष्ट होईल.
जुन्नरला संधी नाहीच
जुन्नरमधून निवडून आलेले पांडुरंग पवार यांचे पारडे 2017मध्येच अध्यक्षपदासाठी जड होते. मात्र ज्या तालुक्यातून सर्वाधिक जि. प. सदस्य निवडून येतील त्याला अध्यक्षपद असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवर यांनी प्रचारादरम्यान सांगितले होते. त्यानुसार बारामतीतून 100 टक्के यश मिळाल्याने या तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळाली. जुन्नर तालुक्यातून राष्ट्रवादीची महिला सदस्या नसल्याने यावेळीही तालुक्याची संधी हुकणार आहे.