ZP Election 2026 – पुणे जिल्हा परिषद आणि इंदापूर पंचायत समिती निवडणुकीसाठी सणसर-लासुर्णे गटात मोठी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप मध्येच खरी लढत होईल असे चित्र असताना या गटामध्ये अपक्षांनी देखील उडी घेतल्याने आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांचा कस लागणार असून ही निवडणूक इंदापूर तालुक्यात कोणासाठीही सोपी नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. जिल्हा परिषदेसाठी सणसर-लासुर्णे गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.तर, सणसर पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी व लासुर्णे पंचायत समिती गण अनुसूचित जाती पुरुष साठी आरक्षित आहे. सध्यातरी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २७ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून उर्वरित दिवसांत कोण माघार घेणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित केले आहेत. या गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत होइल अशी शक्यता असताना या गटात अपक्षांनी एन्ट्री घेतल्याने चुरस वाढणार आहे. सणसर पंचायत समिती गणातून एक व लासुर्णे पंचायत समिती गणातून एक असे दोन इच्छुक व जिल्हा परिषदेसाठीच्या एका इच्छुकाने कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच, या निर्धाराने तिघांनी आघाडी निर्माण केली आहे. आघाडीच्या माध्यमातून ते जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल पाहता भाजपने राज्यामधीला आपली ताकद सिद्ध केली आहे. भाजपने निवडणुकीसाठी ज्या पद्धतीने नियोजन केले, त्यामुळे त्यांनी महापालिका व नगरपालिकेमध्ये विजय संपादन केला. विजयामुळे पक्षातील नेत्यांची व कार्यकर्त्यांची ताकद वाढली असून त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षाने या निवडणुकीसाठी आपली ताकद पणाला लावली आहे.