झेडपी, नगरपालिका शाळांची पुस्तके दाखल

दोन दिवसात वितरण होणार पूर्ण गणवेशाचे अनुदान शाळांनाच

सातारा – जिल्हा परिषद व नगरपालिकांमधील 15 लाख विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तके साताऱ्यात दाखल झाली आहेत. बहुतांश तालुका पंचायत समितींमध्ये पुस्तकांचे वितरण झाले असून उर्वरित तालुक्‍यांमध्ये दोन दिवसात वितरण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, गणवेशाचे अनुदान पालकांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय लांबणीवर पडला असून नेहमीप्रमाणे यंदाच्यावर्षी विद्यार्थ्यांना शाळेमार्फतच गणवेश वितरित केला जाणार आहे.

राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियानअंतर्गत जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळा लवकरच सुरू होणार आहेत. पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमधील एकूण 14 लाख 95 हजार 221 विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके वितरित होणार आहेत.

इयत्ता पहिली ते आठवी वर्गासाठी पुस्तके देण्यात येणार असून सर्वाधिक विद्यार्थी संख्या कराड तालुक्‍यामध्ये आहे. कराड तालुक्‍यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 80 हजार 184 एवढी आहे. कराड तालुक्‍यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 40 हजार 247 एवढी आहे. कराड पाठोपाठ इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या सातारा तालुक्‍यात 1 लाख 12 हजार 128, फलटण तालुक्‍यात 1 लाख 1 हजार 158, खटाव तालुक्‍यात 73 हजार 197, पाटण तालुक्‍यात 69 हजार 90, माण तालुक्‍यात 65 हजार 806, कोरेगाव तालुक्‍यात 63 हजार 220, वाई तालुक्‍यात 48 हजार 151, खंडाळा तालुक्‍यात 40 हजार 845, जावली तालुक्‍यात 22 हजार 511, महाबळेश्‍वर तालुक्‍यात 14 हजार 57 एवढी विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्याचबरोबर इयत्ता सहावी ते आठवी वर्गांमधील सर्वाधिक विद्यार्थी संख्या कराड तालुक्‍यात आहे.

कराड तालुक्‍यात 1 लाख 39 हजार, सातारा तालुक्‍यात 1 लाख 11 हजार 223, फलटण तालुक्‍यात 65 हजार 708, पाटण तालुक्‍यात 70 हजार 658, कोरेगाव तालुक्‍यात 62 हजार 395, खटाव तालुक्‍यात 68 हजार 476, माण तालुक्‍यात 65 हजार 708, खंडाळा तालुक्‍यात 39 हजार 433, वाई तालुक्‍यात 46 हजार 162, महाबळेश्‍वर तालुक्‍यात 14 हजार 411, जावली तालुक्‍यात 23 हजार 653 एवढी विद्यार्थी संख्या आहे. या सर्व विद्यार्थ्यांना लवकरच मोफत पुस्तके वितरित केली जाणार आहेत. दरम्यान, शासन दरवर्षी विशेषत: मुली आणि अनूसूचित जाती-जमाती प्रवर्ग व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरित करित असते.

यावर्षी थेट पालकांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वितरित करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र, तो यशस्वी न झाल्यामुळे यंदाच्यावर्षी पुन्हा एकदा शाळेमार्फतच प्रत्येकी दोन गणवेश वितरित केले जाणार आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमधील एकूण 72 हजार 708 मुली, अनूसुचित जाती-जमाती प्रवर्ग आणि दारिद्रय रेषेखालील 16 हजार 146 विद्यार्थ्यांना गणवेश वितरित केला जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.