नवी दिल्ली – इंटरनेटवर आधारित खाद्य पुरवठा करणाऱ्या झोमॅटो कंपनीला गुंतवणूकदारांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला. त्यामुळे या कंपनीच्या आयपीएलची चांगली विक्री झाली होती. या कंपनीचे शेअर आज शेअर बाजारावर नोंदण्यात आले. सुरुवातीच्या दिवसातच कंपनीच्या शेअरच्या भावात बरीच वाढ झाली. त्यामुळे झोमॅटो कंपनीचे बाजार मुल्य एक लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
आयपीओमधील शेअरची किंमत 76 रुपये होती. आज बाजार बंद होताना या शेअरची किंमत 53 टक्क्यांनी वाढली आणि शेअर 116 रुपयांवर बंद झाला. या माध्यमातून कंपनीने 9,375 कोटी रुपये उभे करण्याचे ठरविले होते.
गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आणि उपलब्ध शेअरच्या 38 पट मागणी नोंदली गेली. या रकमेचा उपयोग कंपनी भारतातील आपला व्यवहार वाढविण्यासाठी करणार आहे. 2008 मध्ये झोमॅटोची कंपनी स्थापना झाली होती. भारतातील 525 शहरात या कंपनीची सेवा आहे. त्याचबरोबर भारताबाहेर 23 देशातही ही कंपनी सेवा देते.
अतिशय खडतर परिस्थितीत ग्राहकांवर विश्वास ठेवून दहा वर्षापूर्वी आम्ही ही सेवा सुरू केली. दरम्यानच्या काळामध्ये गुंतवणूकदारांनी आम्हाला निरंतर पाठिंबा दिला. त्यामुळे झोमॅटो कंपनीचा शेअर आज शेअर बाजारावर नोंदला गेला. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मात्र आम्ही न थांबता काम करीत राहणार आहोत.
–दिपिंदर गोयल
मुख्य कार्यकारी अधिकारी, झोमॅटो