मुंबई – फळ विक्रेत्यासोबतचा किरकोळ वाद झोमॅटो डिलिव्हरी बॉयसाठी जीवघेणा ठरला आहे. ही घटना आज पहाटे १२.३०च्या सुमारास पवई उपनगरात घडली असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, पवई येथील एका हॉटेलबाहेर फळाची गाडी लावण्यावरून झोमॅटो डिलिव्हरी बॉय अमोल भास्कर सुरतकर याचे आज पहाटे फळ विक्रेता सचिन दिनेश सिंग व त्याचा साथीदार जितेंद्र हरिराम रायकर यांच्याशी वाद झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्यांनतर फळविक्रेता सचिन याने रागाच्या भरात अमोल याच्या छाती व पोटावर चाकूने वार केले.
चाकू हल्ल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमोलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्य झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, अमोलवर वार करून घटनास्थळावरून पळ काढलेला आरोपी सचिन दिनेश सिंग उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी फरार होण्याच्या प्रयत्नात होता परंतु मुंबई पोलिसांनी त्याला कुर्ला रेल्वे स्थानकावरच जेरबंद केलं. फळगडी लावण्यावरून अमोल व सचिन यांच्यामध्ये वारंवार वाद होत असत अशी माहिती मिळाली आहे.
ऑनलाईन पद्धतीने रात्री उशिरापर्यंत अन्न पदार्थांचे वितरण करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढीस लागली असून यामुळं गुन्हेगारी प्रकरणांमध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सचिन दिनेश सिंग व त्याचा साथीदार जितेंद्र हरिराम रायकर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) व कलम ३४ (समान हेतू) नुसार गुन्हा दाखल केला आहे.