करोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा आगाराचा निर्णय
सातारा (प्रतिनिधी) – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय आस्थापना आपापल्या परीने काळजी घेत आहे. सातारा एसटी आगाराने प्रवाशांसाठी एसटी प्रवासात झिकझॅक आसनव्यवस्था सक्तीची केली आहे. त्यामुळे एसटीच्या एकूण आसनक्षमतेच्या निम्मे प्रवासी सध्या बसेसमधून प्रवास करत आहेत.
सातारा बसस्थानकात होणारी गर्दी कशी टाळायची, हा जटील प्रश्न आहे. पंढरपूर, कोल्हापूर, पुणे, कोकण, सांगली, सोलापूर या शंभर ते दोनशे किलोमीटरच्या प्रवासासाठी सातारा बसस्थानक मध्यवर्ती आहे. साताऱ्यातून पुणे, मुंबई, कोल्हापूर, मिरज, हैदराबाद, सोलापूर, पंढरपूर, नाशिक या लांब पल्ल्याच्या बससेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आहे. नोकरीच्या निमित्ताने सातारा-पुणे रोज अपडाऊन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही रोजची गर्दी टाळण्याजोगी नसल्याने आता एसटी बसेसमधील आसनांवर प्रवाशांसाठी “झिकझॅक’ आसनव्यवस्था करण्यात आली आहे. एक प्रवासी दुसऱ्याच्या शेजारी बसणार नाही.
लगतचे आसन वगळून मागील आसनावर दुसरा प्रवाशी तिरक्या रेषेत बसणार आहे. त्यामुळे दोन प्रवाशांमध्ये तीन फुटांपेक्षा जास्त व सुरक्षित अंतर राखले जाणार आहे. मास्क आणि झिकझॅक आसनव्यवस्थेची सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक आर. एस. भोसले यांनी दिली. एकूण आसनक्षमतेच्या (48) निम्मी, म्हणजे 25 आसने भरण्यासाठी किमान चाळीस मिनिटे लागत आहेत. त्यामुळे एसटीच्या फेऱ्यांना व महसुलाला फटका बसला आहे. सातारा-पुणे विनाथांबा बसेसच्या 56 फेऱ्या रोज होत होत्या. त्या निम्म्या कमी झाल्या आहेत.
शिवशाही बसेसमध्ये पेस्ट कंट्रोल
सातारा आगारात मुंबई मार्गावरील बसेस वगळता सर्व शिवशाही बसेस थांबवण्यात आल्या आहेत. सध्या सातारा आगारात 40 शिवशाही बसेस आहेत. या गाड्यांची रचना आरामदायी असून त्यामध्ये धातू व कुशनचा वापर अधिक आहे. त्यामुळे या गाड्यांमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यात येत असल्याने त्यांची सेवा थांबवण्यात आली आहे. लाल रंगाच्या एसटी बसेसची आगाराच्या वर्कशॉपमध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासानंतर सर्व बसेस स्वच्छ धुतल्या जात असून दरवाजांचे हॅंडल, आसने व मेटल फोमचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.