हरारे – गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीनंतर सलामीवीर शिखर धवन व शुभमन गिल यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने यजमान झिम्बाब्वेचा 10 गडी राखून दणदणीत पराभव केला. या विजयासह भारताने तिन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देताना 1-0 अशी आघाडीही घेतली. तब्बल सहा महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत 3 गडी बाद करणाऱ्या दीपक चहरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
भारतीय संघातील गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 189 धावांवर रोखले व त्यानंतर 31 व्या षटकांत एकही गडी न गमावता 192 धावा करत सहजविजय प्राप्त केला. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना धवन व गिल यांनी सुरुवातीला सावध फलंदाजी केली.
खेळपट्टीवर स्थिरावल्यावर मात्र, त्यांनी फटकेबाजीही केली. या जोडीने 31 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर भारताचा विजय साकार केला. धवनने गिलसह अखंडीत 192 धावांची सलामी देत विक्रम साकार केला. त्याने आपल्या नाबाद 81 धावांच्या खेळीत 113 चेंडूत 9 चौकार फटकावले. गिल काहीसा जास्त आक्रमक होता. त्याने नाबाद 82 धावांची खेळी करताना 72 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली.
झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनीही भारतीय गोलंदाजांप्रमाणेच 29 अवांतर धावांची रसद भारतीय संघाला पुरवली. धवनने 31 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार फटकावला व संघाचा विजय साकार केला. भारताने 2013 ते 2022 या कालावधीत झिम्बाब्वेचा सलग 13 वा पराभव करत विक्रम साकार केला. यापूर्वीही भारतीय संघाने 2002 ते 2005 या कालावधीत त्यांना सलग 10 वेळा पराभूत केले होते.
That’s that from the 1st ODI.
An unbeaten 192 run stand between @SDhawan25 & @ShubmanGill as #TeamIndia win by 10 wickets.
Scorecard – https://t.co/P3fZPWilGM #ZIMvIND pic.twitter.com/jcuGMG0oIG
— BCCI (@BCCI) August 18, 2022
त्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार लोकेश राहुल याने नाणेफेक जिंकून यजमान झिम्बाब्वेला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मुख्यत्वे दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त होऊन संघात परतलेला वेगवान गोलंदाज दीपक चहरने त्यांच्या सलामीसह मधल्या फळीला तंबूचा रस्ता दाखवला. त्यांचा भरात असलेला फलंदाज इनोसेंट काइया साफ अपयशी ठरला.
त्याच्या पाठोपाठ प्रमुख फलंदाजंनी निराशा केल्यामुळे त्यांची स्थिती 4 बाद 31 वरून आणखी खराब होत 5 बाद 66 अशी बिकट बनली होती. त्यावेळी कर्णधार व यष्टीरक्षक फलंदाज रेगिस चकाब्वाने 35 धावांची खेळी केली व संघाचा डाव सावरला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा व अक्सर पटेल यांच्यासमोर त्यांची घसरगुंडी उडाली. मात्र, तळात रिचर्ड गरावा व अनुभवी ब्रॅड इव्हान्स यांनी 9 व्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली व संघाला 40.3 षटकांत सर्वबाद 189 धावा अशी समाधानकारक स्थिती प्राप्त करून दिली.
गरावाने 42 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावताना 34 धावांची खेळी केली. इव्हान्सने नाबाद 33 धावांची खेळी करताना 29 चेंडूंचा सामना करत 3 चौकार व 1 षटकार फटकावले. भारताकडून दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा व अक्सर पटेल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. महंमद सिराजने 1 बळी घेतला. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी यजमान संघाच्या फलंदाजांना 25 अवांतर धावांची खिरापत दिल्यामुळेच ते दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारू शकले.
संक्षिप्त धावफलक –
झिम्बाब्वे – 40.3 षटकांत सर्वबाद 189 धावा. (रेगिस चकाब्वा 35, रिचर्ड गरावा 34, ब्रॅड इव्हान्स नाबाद 33, अवांतर 25, अक्सर पटेल 3-24, दीपक चहर 3-27, प्रसिद्ध कृष्णा 3-50, महंमद सिराज 1-36).
भारत – 30.5 षटकांत बिनबाद 192 धावा. (शुभमन गिल नाबाद 82, शिखर धवन नाबाद 81, अवांतर 29).