ढाका – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाची मान्यता काढून घेतली असली तरी त्यांचा संघ तीन देशांच्या बांगलादेश चषक टी-20 स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत या देशांबरोबरच अफगाणिस्तानचा संघ भाग घेत आहे. ही स्पर्धा 13 ते 24 सप्टेंबर या कालावधीत होणर आहे.
बांगलादेश क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते जलाल युनुस यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, झिम्बाब्वेचा संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळ शकणार नसला तरी अन्य देशांबरोबर सामने खेळण्यास त्यांना परवानगी असल्यामुळेच आम्ही त्यांना या स्पर्धेत सहभागी करून घेतले आहे. आम्ही अफगाणिस्तानबरोबर मालिका खेळणार होतो. झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघटकांनी आम्हाला या मालिकेत सहभागी करून घेण्याची विनंती केली. ही विनंती आम्ही मान्य केली.
अफगाणिस्तानचा संघ 30 ऑगस्टला बांगलादेशात दाखल होणार आहे. 1 व 2 सप्टेंबर रोजी त्यांचा संघ अध्यक्षीय संघाबरोबर चितगाव येथे सराव सामना खेळणार आहे. 5 ते 9 सप्टेंबरदरम्यान अफगाणिस्तान व बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामना होईल.
झिम्बाब्वेचा संघ 8 सप्टेंबरला बांगलादेशात दाखल होणार आहे. 11 सप्टेंबर रोजी त्यांचा अध्यक्षीय संघाबरोबर फातुल्ला येथे सराव सामना आयोजित करण्यात आला आहे.