थेऊर -जिल्ह्यातील ग्रामीण भागातील करोनाबाधित अथवा संशयित रुग्णांनी नोंदणीकृत खासगी रुग्णालयांत उपचार घेतल्यास डॉ. रखमाबाई राऊत योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी यांना आपल्या कार्यक्षेत्रातील बाधित अथवा संशयित रुग्णांवर नोंदणीकृत खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असतील अशा रुग्णांचे प्रस्ताव योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यात या कार्यालयास त्वरित सादर करावेत. असे आदेश पत्राद्वारे दिले आहेत.
योजनेच्या लाभासाठी लाभार्थी रुग्ण हा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा. त्याने ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेतले असतील ते रुग्णालय बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत नोंदणीकृत असावे. हा लाभ केवळ बाधित अथवा संशयित रुग्णावरील उपचारासाठीच देय राहील. लाभार्थी महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, धर्मादाय आयुक्तांकडील मदत योजना अथवा इतर कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा (वैयक्तिक आरोग्य विमा योजना इ.) लाभधारक नसावा.
असे मिळतील पैसे
योजनेंतर्गत करोना संशयित रुग्ण म्हणून उपचार घेतल्यास 5 हजार, विलगीकरण केलेल्या बाधितांसाठी 50 हजार, आयसीयूमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांकरिता 75 हजार, तर व्हेंटिलेटरवर उपचार घेतलेल्या रुग्णांकरिता 1 लाख रुपये 14 दिवसांचे उपचारांसाठी मिळणार आहेत. या मर्यादेत किंवा रुग्णावर प्रत्यक्षात उपचारासाठी आलेला खर्च यापैकी जी रक्कम कमी असेल ती अर्थसहाय्य म्हणून देण्यात येईल.