देऊळगाव राजे – पूरग्रस्त कुटुंबियांना घर दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून 15 हजार रुपयांची मदत लवकरच मिळणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिले. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील पूरग्रस्त कुटुंबांची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी सिद्धटेक येथील भीमा नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणीही त्यांनी केली.
जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी केलेल्या मागणीवर बोलताना देवकाते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये हा निर्णय घेणार आहे. महसूल प्रशासनाकडून शिरापूर येथील पूरबाधित कुटुंबियांना दहा किलो धान्य आणि पाच हजार रुपयांची तात्काळ मदत 88 कुटुंबियांना दिली जाते आहे, याबाबत तलाठी हरीचंद्र फरांदे यांनी माहिती दिली.
यावेळी देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना पुरामुळे उद्भवणाऱ्या साथीच्या आजाराबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देवकाते यांनी केल्या आहेत.