पाथर्डीत जिल्हा परिषदेच्या शाळाखोल्या पाडल्या

नागरिकांचा गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात दिवसभर ठिय्या

पाथर्डी – शहरातील खुले नाट्यगृह विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या आठ खोल्या विनापरवाना पाडून तेथील साहित्याची विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पालिका प्रशासनाकडून या जागेबाबत मालकी हक्क सांगितला जात आहे. मात्र निर्लेखन परवाना नसतानाही शाळा खोल्या पाडल्या बद्दल मौन बाळगले जात आहे. शाळाखोल्या पाडून बरेच दिवस उलटले तरी शिक्षण विभागाकडून कारवाईसाठी कुठलीही हालचाल होत नसल्याने नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पालिका प्रशासन व शिक्षण विभागची डोकेदुखी ठरलेल्या या प्रकरणाबाबत मात्र राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहराच्या मध्यवर्ती व मोक्‍याच्या ठिकाणी सिटी सर्व्हे नंबर 1071 हा मोठा भूखंड आहे. या भूखंडाच्या दक्षिण बाजूला सुमारे पंचवीस वर्षापूर्वी खुले नाट्यगृह बांधण्यात आलेले आहे. नाट्यगृहाच्या उत्तर बाजूला जिल्हा परिषदेच्या आठ शाळा खोल्या होत्या. जिल्हा परिषदेकडून 6 हजार 89 चौरस फूट जागेची घरपट्टी, पाणीपट्टी व शाळा सुरू असेपर्यंत वीजबिल नियमात भरण्यात येत होते.

शासनाच्या वैशिष्ट्‌यपूर्ण योजनेतून सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून हे खुले नाट्यगृह विकसित करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने या कामाचा कार्यारंभ आदेश दिलेला आहे. 2 जुलै रोजी पालिका प्रशासनाने गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून शाळाखोल्या पाडण्याची परवानगी मागितली होती. मात्र निर्लेखनाची परवानगी नसताना जिल्हा परिषद शाळेच्या सर्व खोल्या भुईसपाट करून खोल्यांचे दारे, खिडक्‍या, अँगल व पत्र्याची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे.घटना घडून अनेक दिवस उलटले तरी शिक्षण विभागाने बघ्याची भूमिका घेतली आहे. याबाबत तालुक्‍यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.