अहमदनगर – अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दुरध्वनीवरून धमकी देण्यात आली असून या संदर्भात भांगरे यांनी राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामेश्वर गजानन शातलवार (डोंबिवली) याच्या विरोधात निनावी संदेशाद्वारे धमकाविण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सुनीता भांगरे यांनी काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास प्रकल्पातील मुतखेल येथील आश्रमशाळेला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांतील सुविधांचा अभाव तसेच येथील कारभाराबाबत सुनीता भांगरे यांनी आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील कारभाराचा पंचनामा केला. त्याचा राग मनात धरून मुतखेल आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांचा भाऊ बोलत असल्याचे सांगून भांगरे यांना फोन करून शिवीगाळ करण्यात आली. आमच्या वाटेला जाऊ नका, असे सांगून खुनाची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी अधिक तपास राजूर पोलिस करत आहेत.