सोलापूर – मुख्याध्यापकाकडे पद स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
सुहास घेळेकर असे अटक करण्यात आलेल्या प्रशासन अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास करण्यात आली. तक्रारदार यांनी राज्य सरकारच्या पती-पत्नी एकत्रीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक घेळेकर यांनी पंचवीस हजार रुपये मागणी करत असल्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदाराने जवळच्या रिक्त शाळेत मुख्याध्यापकपदी बदली होण्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे 8-9-2021 रोजी तक्रार प्राप्त झाली होती.
या तक्रारीची पडताळणी पंचांसमक्ष केली असता त्यातील आरोपीकडून तडजोडीअंती पंधरा हजार रुपये लाच मागणी करण्यात आली. याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने या प्रकरणातील आरोपी सुहास घेळेकर यांना अटक केली आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तीन दिवसांत लाचेची ही दुसरी कारवाई आहे. तीन दिवसांपूर्वी समाज कल्याण विभागातील कक्ष अधिकारी स्वामी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.