जिल्हा परिषद शाळा बनली तळीरामांचा अड्डा

बारागाव नांदूर शाळामध्ये मोकळ्या बाटल्या

राहुरी,  (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्‍यातील बारागाव नांदूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तळीरामांनी आपला अड्डा बनविला आहे. जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बसून तळीरामांनी मोकळ्या बाटल्या टाकून दिल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे.

देशात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सर्वच लढा देत असताना दुसरीकडे मात्र तळीरामांना आपल्या गरजा भागविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. दारू दुकाने बंद असतानाही अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. गावठी दारू व देशी, विदेशी दारूचा साठा केला जात आहे. बंदमुळे तळीरामांची संघटनाही बळकट होत असल्याचे चित्र आहे. कितीही बंद ठेवा परंतु आम्ही आमचे व्यसन पूर्ण करणारच म्हणत तळीरामांकडून गावांमध्ये धुडगूस सुरूच आहे.

दरम्यान, बारागाव नांदूर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज चालते. सदरच्या ठिकाणी काही तळीरामांनी बैठक मांडत पार्टी केल्याचे चित्र दिसून आले आहे. दारूच्या बाटल्या, वेफर्स पाकीटांचा खच आरोग्य केंद्र इमारती समोर दिसून आला. याप्रमाणे एकीकडे करोना विरोधात लढाई सुरू असताना दुसरीकडे मात्र, तळीरामांकडून नियमांची ऐशी तैशी केली जात आहे. तर बंद शासकीय कार्यालय व शाळांचा वापर तळीराम आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.