विविध विभागांतील वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका
नगर – मुद्रांक,महसूल,पाटबंधारे अशा विविध विभागांकडे जिल्हा परिषदेचे 48 कोटी 12 लाख 32 हजार 428 रूपये येणे प्रलंबित आहेत. वर्षनवर्ष याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने या थकीत रकमा वाढतच आहे. आता त्या वसुल करण्यासाठी अर्थ व कृषी विभागाचे सभापती सुनील गडाख यांनी पुढाकार घेतला असून यासाठी विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.फे ब्रुवारी अखेर या वुसल्या करण्याचे उद्दीष्ट आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 146 नुसार 20 टक्के पाटबंधारे स्थानिक निधी जिल्हा परिषदेस देणे बंधनकारक आहे. मात्र जिल्हा परिषदेस देय असलेला स्थानिक निधी जिल्हा परिषदेच्या थकबाकी रक्कमेतून पाटबंधारे विभाग परस्पर समायोजीत करत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेस स्थानिक निधी उपलब्ध होत नसल्याने कामे होण्यास अडचणी निर्माण होतात.
नगर जिल्हा पाटबंधारे विभागाकडे सन 2014 ते 19 पर्यंतचे एक कोटी 15 लाख, मुळा पाटबंधारे विभागाकडे सन 2010 ते 19 पर्यंतचे 49 लाख, गोदावरी पाटबंधारे विभागाकडे सन 2019 अखेर साडेपंचाळीस लाख, कुकडी पाटबंधारे विभागाकडे सन 2016 ते 2019 अखेर 97 लाख 66 हजार असे एकूण 3 कोटी 76 लाख 3 हजार येणे आहेत.
तसेच जमीन महसूल अनुदानपोटी सन 2016 ते 19 अखेर पावणेतीन कोटी, जमीन महसूल उपकरापोटी सन 16 ते 19 अखेर साडेआठ कोटी, जमीन समानीकरण पोटी 3 कोटी, माफ केलेला वाढीव उपकर अनुदान पोटी 15 कोटी, मुद्रांक शुल्क अनुदान पोटी 21 कोटी असे एकूण साडेपंचाळीस कोटी असे सर्व विभागांचे मिळून 48 कोटी 12 लाख 32 हजार 428 रूपये येणे प्रलंबित आहे.
यातील पाटबंधारे विभागाच्या वसुलीसाठी बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे, मुद्रांक शुल्क वसुलीसाठी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील तुंभारे, महसूल विभागाच्या वसुलीसाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी या थकबाकीच्या वसुलीसाठी प्रयत्न करायचे आहेत.