नवे पदाधिकारी निवडेपर्यंत विखेच काळजीवाहू अध्यक्ष; पं.स.पदाधिकारी निवड तारखा लवकरच जाहीर करणार
नगर – जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापतींची मुदत आज,दि.20 संपली. त्यामुळे शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी नव्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम आज जाहीर केला.
त्यात जिल्हा पारिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड मंगळवार,दि.31 डिसेंबरला दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात होईल. तर पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम दोन-तीन दिवसात जाहीर केला जाईल,अशी माहिती जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी दिली.
दरम्यान, या प्रक्रियेला किमान दहा दिवसांचा कालावधी जाणार असल्याने या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक नेमण्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार प्रशासक न नेमता सध्या जे पदाधिकारी आहेत तेच काळजीवाहू पदाधिकारी म्हणून नवे पदाधिकारी निवडेपर्यंत काम पाहतील. त्यामुळे शालिनीताई विखे यांच्याकडेच 31 डिसेंबरपर्यंत काळजीवाहू अध्यक्ष म्हणून पदभार राहिल.
73 जिल्हा परिषद सदस्यांना निवडणूक कार्यक्रमाच्या नोटीसा उद्या पाठविण्यात येणार आहेत. या नोटिसाव्दारे जिल्हा परिषद सदस्यांसाठी दहा तर पंचायत समिती सदस्यांसाठी सात दिवसांचा कालावधी बंधनकारक असतो. त्या कालावधीच्या नंतर निवडणुका घ्याव्या लागतात. त्याप्रमाणे हा पदाधिकारी निवड कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंचायत समितीचा निवडणुक कार्यक्रम येत्या दोन-तीन दिवसात जाहीर होणार आहे.
जिल्हा परिषदेत गटनेते हे घटनात्मक पद नाही
विधीमंडळात,महानगरपालिकेत जसे गटनेते घटनात्मक पद आहे तसे जिल्हा परिषदेत गटनेते हे घटनात्मक पद नाही. त्यामुळे या गटनेत्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार आहे किंवा नाही याबाबतचा निर्णय निवडणूक अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारीच घेवू शकतात. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेला पण याबाबत काहीच कल्पना नाही. सध्याच्या राजकीय घडामोडीत काही सदस्यांनी पक्ष बदलेले असल्याने त्यांना पक्षाचा म्हणजेच गटनेत्याचा व्हीप जारी राहणार की नाही याबाबत अद्याप संभ्रामवस्था आहे.