जिल्हा परिषद : औषध घोटाळ्यावर मलमपट्टी, की थेट “शस्त्रक्रिया’?

प्रकरण चिघळण्याची चिन्हे : औषधे जमिनीत गाडल्याचाही खळबळजनक आरोप

पुणे – “औषध घोटाळ्याची चौकशी कुठपर्यंत आली, प्रशासन एवढे शांत का? असा प्रश्‍न उपस्थित करत, ज्या ठिकाणी औषधांचा साठा सापडला तेथे जमिनीमध्येही औषधे गाडल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले,’ असा गौप्यस्फोट शरद बुट्टेपाटील यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभागृहात केला. त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषद आरोग्य विभागातील औषध घोटाळा “चिघळणार’ असे दिसते. त्यावर “मलमपट्टी’ होणार की थेट “शस्त्रक्रिया’ याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील गोडाऊनमध्ये भंगाराच्या टेम्पोमध्ये एक कोटी रुपयांची औषधे सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे प्रशासन चांगलेच हादरले. याप्रकरणात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये हात गुंतल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिलेल्या सूचनेनुसार गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स ऍन्ड इकॉनॉमिक्‍स या संस्थेकडून या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात आले. परंतू, अनेक महिन्यांपासून हा दडपण्यात आला. ज्यावेळी बुट्टेपाटील यांनी प्रकरणाचा पर्दाफाश केला, त्यानंतर सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.
याप्रकरणाची चौकशी संथ गतीने सुरू आहे. जिल्हा परिषदेत चुकीच्या प्रथा सुरू असून, कर्मचारीच जिल्हा परिषद चालवतोय असे चित्र दिसते.

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी “फास्ट ट्रॅक’वर करावी, असे मागणी करत “ज्या वेळी गोडाऊन गेलो त्यावेळी जमिनीखाली एक ट्रक औषधे गाडल्याचे’ कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही गंभीर बाब असून, त्याची सखोल चौकशी व्हावी.

या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नये, जेवढे तुम्ही खोलात जाऊन चौकशी कराल, त्यावेळी धक्कादायक बाबी समोर येतील. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची मोठी साखळी असून, त्रयस्थ व्यक्तींकडून चौकशी करावी. अशी मागणी सदस्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.