जिल्हा परिषद अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा

स्वउत्पन्न वाढविण्याची विरोधकांची मागणी : जागा विकसित करण्याचे सत्ताधाऱ्यांचे आश्‍वासन

सातारा – देशात व राज्यात गौरविलेल्या सातारा जिल्हा परिषदेचे वार्षिक बजेट यंदाच्या वर्षीही तोकड्या रक्कमेचे सादर करण्यात आले. सन 2019- 2020 आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून केवळ 45 कोटी रूपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली. त्यामुळे विरोधी सदस्य दिपक पवार यांनी टोलेबाजी करत बजेट किमान 100 कोटी रूपयांचे तरी असायला हवे अन त्यासाठी जागा विकसित करण्याची मागणी केली. विरोधकांची मागणी मान्य करत पुढील वर्षी बजेट वाढविण्याचे आश्‍वासन सत्ताधाऱ्यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेचे आयोजन संजीवराजे ना.निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.कैलास शिंदे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगौड आदी.उपस्थित होते.

अर्थ सभापती राजेश पवार यांनी बजेट सादर करताना महसूली उत्पन्न 45 कोटी तर खर्च 44 कोटी 98 लाख 50 हजार इतका प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यापैकी शिक्षण विभागासाठी 3 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये स्व.खशाबा जाधव कुस्ती स्पर्धांचे आयोजन, जि.प.शाळांना डिजीटल क्‍लासरूम, संगणक आज्ञावली पुरविणे व डस्टबीन वाटप, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सी. आणि एम.पी.एस.सी. व इतर स्पर्धा परिक्षांसाठी मागदर्शन सत्रांचे आयोजन, यशवंत गुरूकुल व तळदेव वसतिगृह शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांचे आयोजन, विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास स्पर्धासाठी तरतूद करण्यात आली आहे.

बांधकाम विभागासाठी 8 कोटी 20 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते, जिल्हा परिषद इमारत, लॉंच सुविधा, विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तीवेतनासह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मालकीच्या जागा विकसित करण्यासाठी आखलेल्या योजनेच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. सामान्य प्रशासनासाठी 2 कोटी 79 लाख रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ते व कर्मचारी-अधिकारी यांच्या क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागासाठी 1 कोटी 15 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये आरोग्य केंद्रांना वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणे, लसीकरण साहित्य, साथीच्या रोगावर नियंत्रण आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. कृषी विभागासाठी 1 कोटी 65 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये ताडपत्री, कृषी अवजारे, पीक संरक्षण साहित्य, कडबाकुट्टी सयंत्र, कोळपी, औषधे पुरविणे आणि सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्याचा समावेश करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागासाठी 75 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये जनावरांची औषधे, शेळी वाटप, पशुपक्षी प्रदर्शन तसेच संकरित जनावरे, दुबती जनावरे वाढविणे आणि पशुधन वाढविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागासाठी 3 कोटी 8 कोटी लाख 90 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये यशवंत घरकुल योजना, मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते व स्वच्छतागृहे बांधणे, समाजमंदिर बांधकाम व दुरूस्ती, गजीनृत्य साहित्य वितरण व स्पर्धाचे आयोजनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर अपंग कल्याण निधीसाठी 1 कोटी 55 लाख 61 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महिला बालकल्याण विभागासाठी 1 कोटी 54 लाख 45 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र स्थापन करणे, अभ्यासदौरा, अंगणवाडी इमारत, किशोरवयीन मुलींना ज्युदो व कराटे प्रशिक्षण, सायकल, पिकोफॉल मशिन वाटप, संगणक प्रशिक्षणसह इतर साहित्य वाटपासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पासाठी 5 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये अंगणवाड्यांना साहित्य व नोंदवह्या आणि क्षेत्रींय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी 1 कोटी 30 लाख रूपयांची तर जिल्हा परिषद मुद्रणालयासाठी 3 कोटी 35 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गुदगे विरोधीपक्षनेते अन सीईओ अध्यक्ष

दरम्यान, अर्थसंकल्पासह व विषयपत्रिकांमधील त्रुटी सुरेंद्र गुदगे यांनी निदर्शनास आणून दिल्या. एवढेच नव्हे तर गुदगे यांनी, आता आम्हा सदस्यांकडून विषय मंजूर करून घेत आहात मात्र, आमची कामे मंजूर करताना पदाधिकारी नियमावर बोट ठेवत असल्याचे निदर्शनास आणून दिले. एकूणच सभेत गुदगे यांनी सत्ताधारी अन विरोधकांची एकत्रित भूमिका बजावल्याचे दिसून आले. तर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर अध्यक्षांनी व बजेट सादर केलेल्या अर्थ सभापतींनी उत्तर देणे अपेक्षित होते. परंतु सदस्यांच्या सर्वाधिक प्रश्‍नांची उत्तरे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनीच दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.