नीरा -झिका व्हायरसने पुण्याच्या ग्रामीण भागात प्रवेश केला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. पुण्याच्या ग्रामीण भागातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील एका वृद्ध महिलेला झिकाची लागण झाली होती.
त्यानंतर आता पुण्यातील काही गावांना संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सात गावे झिकाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली. त्यामुळे पुरंदर आरोग्य विभागाने उपाययोजना व जनजागृतीस सुरवात केली आहे.
झिका हा डेंग्यू व चिकुनगुनियासदृश आजार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मागील तीन वर्षांत सातत्याने डेंग्यू व चिकुनगुनियाचा उद्रेक झालेली गावे ही झिकाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.
जिल्ह्यातील 79 गावांना झिकाचा संभाव्य धोका असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या संभाव्य गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत झिका, डेंग्यू व चिकुनगुनियाच्या विरोधात सतर्क झाले आहेत. प्रत्येक प्रभागातील सार्वजनिक ठिकाणी दर्शनी भागात फ्लेक्स, हॅंडवेल, घंटागाडीवरून जनजागृती सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सूचना देण्यात येत आहे, अशी माहिती सरपंच तेजश्री काकडे यांनी दिली.
अतिसंवेदनशील गावे
पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, नीरा, बेलसर, ढुमेवाडी, पारगाव, सुपे (खुर्द) ही सात गावे झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
एका गावात डेंग्यू, चिकुनगुनियाचे जास्त रुग्ण आढळल्यास उपाययोजना करण्यास सोयीस्कर होईल. त्यासाठी डेंग्यू चिकुनगुनिया रुग्णांची नोंद खासगी रुग्णालयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात करणे अनिवार्य आहे.
एक दोन दिवस ताप सदृश आजार असल्यास रुग्णांनी निष्काळजीपणा न करता, प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त तपासणी करावी. डेंग्यू, चिकुनगुनियाची तपासणी मोफत करुन घ्यावी.
– डॉ. उज्वला जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी
झिकाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्कता बाळगत ग्रामपंचायतीला जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. औषध फवारणी, धुरळणी करण्यात येत आहे. जास्तीत जास्त गरोदर महिलांमध्ये जनजागृती करण्याचे काम आरोग्य कर्मचारी,
आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत सुरु आहे. सोमवारी नीरेतील 31 गरोदर मातांची बैठक घेऊन 17 महिलांना करोना प्रतिबंधीत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
– डॉ. अक्षय म्हवाण, वैद्यकीय अधिकारी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र.