रामस्टेन हवाई तळ (जर्मनी) – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांनी काल अमेरिका आणि ५० पेक्षा जास्त मित्र देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. युक्रेनला रशियाविरुद्धच्या लढ्यामध्ये मदत करण्यासाठी त्यांनी या देशांच्या अधिकाऱ्यांना आवाहन केले.
या चर्चेनंतर अमेरिकेने युक्रेनला आणखी २५० दशलक्ष डॉलरच्या लष्करी मदतीची घोषणा केली. युक्रेनला या भेटीमुळे मोठी मदत मिळेल, अशी आशा अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी या चर्चेनंतर व्यक्त केली.
सध्या रशियाच्या सैन्याकडून युक्रेनमधील पोक्रोव्हस्क शहरावर आक्रमण केले जाते आहे. पोक्रोव्हस्क शहर रशियाच्या हातात पडले तर युक्रेनमधील अन्य काही शहरेही रशियाच्या ताब्यात जाण्याचा धोका आहे.
युक्रेनने रशियाच्या कुर्स्क प्रांतात केलेल्या धडक मोहीमेमुळे आतापर्यंत तरी रशियाकडून आपल्या सैन्याचा मोर्चा वळवला गेलेला नाही. रशियाला बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पाडण्यासाठी रशियाच्या आतपर्यंत मारा करू शकणारी शस्त्रे युक्रेनला हवी आहेत.
रशियाकडून युक्रेनच्या आतपर्यंत हवाई हल्ले केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे रशियाच्या आतपर्यंत मारा करण्याची अनुमती मिळावी, असे आवाहन झेलेन्स्की यांनी यावेळी केले. दोन वर्षांपूर्वी रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेन संरक्षण संपर्क गटाच्या सदस्य देशांनी युक्रेनला १०६ अब्ज डॉलर इतकी प्रचंड लष्करी मदत केली आहे.
एकट्या अमेरिकेने युक्रेनला ५६ अब्ज डॉलर पेक्षा जास्त लष्करी मदत दिली आहे. या गटाच्या सदस्य देशांच्य अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्तान जर्मनीत आलेले झेलेन्स्की हे जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ शुक्रवारी दुपारी फ्रँकफर्टमध्ये भेटणार आहेत.