नगर – रात्रीच्यावेळी वांबोरी घाटात प्रवाशांना हाणमार करून लूटमार करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.16) रोजी करण्यात आली. आरोपीस पुढील तापासाकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
प्रसाद बाबासाहेब चेंडवल, (वय-22, रा. गुंजाळे, ता.नगर, जि. अ.नगर) यास ताब्यात घेतले असून 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच साथीदार विकास बाळु हनवत, कृष्णा शिंदे, ( दोघे रा. कात्रड, ता. राहुरी) व रवि बर्डे (रा. मोरेचिचोरे, ता नेवासा) यांनी मिळूण गुन्हा केला असल्याचे सांगितले. पोलिसांनी यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा चेंडवल यांने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील मनोज गोसावी, रवींद्र कर्डिले, आण्णा पवार, संतोष लोढे, सचिन आडबल, दीपक शिंदे, रवि सोनटक्के, पाथरुट, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांनी गुंजाळे येथे सापळा रचवून आरोपी ताब्यात घेतले. व त्याच्याकडून 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.