झायरा वसिम म्हणते…”सोशल मीडियातून माझे फोटो हटवा’

सोशल मीडियावरून माझे फोटो हटवा, असे आवाहन पूर्वाश्रमीची अभिनेत्री झायरा वसिमने आपल्या चाहत्यांना केले आहे. आपण आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करत असल्याने फिल्म ऍक्‍ट्रेस म्हणून आपली ओळख पूर्णपणे पुसून टाकायची आहे. 

त्यामुळे आपल्या सर्व फॅन्सनी सोशल मीडियावर अपलोड केलेले आपले सर्व फोटो त्वरित हटवावेत, असे आवाहन झायराने केले आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेती असलेल्या झायरा वसिमने गेल्याच वर्षी अचानक आपल्या ऍक्‍टिंग करिअरला पूर्णविराम दिला होता. 

तिने अचानक अभिनय क्षेत्राला सोडचिठ्ठी दिल्याबद्दल खूप उलट सुलट चर्चाही झाली होती. आता अभिनेत्री म्हणून उरलेल्या आठवणी देखील संपवून टाकायच्या असे आपण ठरवले असल्याचे झायराने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या फॅन्सनी आपल्यावर जे प्रेम केले आहे.

त्याच प्रेमाच्या अधिकारातून आणखी एक उपकार करा आणि सोशल मीडियावर अपलोड केलेले माझे सर्व फोटो हटवा, असे झायराने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. इंटरनेटवरील सर्व फोटो हटवणे शक्‍य नसल्याचेही तिने मान्य केले आहे. आपल्या धर्माबरोबर प्रतारणा करता येणार नसल्याचे सांगून तिने बॉलीवूडला बाय बाय केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.