युवराज पुन्हा मैदानावर परतणार

निवृत्तीचा निर्णय मागे घेतला; बीसीसीआयकडूनही परवानगी

मोहाली – भारतीय क्रिकेट संघाचा सिक्‍सरकिंग युवराजसिंग पुन्हा एकदा एक खेळाडू म्हणून मैदानावर परतणार आहे. पंजाब क्रिकेट संघटनेने केलेल्या विनंतीनुसार युवराजने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असून सय्यद मुश्‍ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत युवराजला सहभागी होण्यासाठी बीसीसीआयनेही परवानगी दिली आहे. 

या स्पर्धेसाठी संघटनेने निवडलेल्या 30 खेळाडूंच्या संभाव्य संघात युवराजचा समावेश करण्यात आला आहे. त्याने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तरीही त्याने पुन्हा एकदा पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. या स्पर्धेसाठीचे सराव सत्र येत्या शुक्रवारपासून सुरु होणार असून त्यापूर्वीच युवराजने सरावही सुरु केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज कॅनडामध्ये झालेल्या ग्लोबल टी-20 लीग स्पर्धेत खेळ केला होता. मात्र, आपण आता यापुढे आयपीएल स्पर्धेत खेळणार नसल्याचेही त्याने सांगितले होते. पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांनी युवराजला निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली होती.

त्यांची विनंती मान्य करत युवराजने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्र लिहून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. बीसीसीआयनेही त्याला सकारात्मक पाठिंबा देताना ही परवानगी दिली. मुश्‍ताक अली स्पर्धा पुढील वर्षी 10 ते 31 जानेवारी या कालावधीत होत आहे.

सेकंड इनिंगबाबत उत्सुकता 

कर्करोग झालेला असतानाही युवराजने 2011 सालच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत सहभाग घेतला. भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा युवराज पुन्हा एकदा उत्तुंग फटकेबाजीसाठी सज्ज आहे. अर्थात, त्याला आता भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्‍यता संपुष्टात आलेली असली तरीही त्याच्या चाहत्यांसाठी त्याचे पुनरागमन निश्‍चितच चर्चेचा विषय ठरला आहे.

आयपीएलमधील सहभागाची शक्‍यता 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना आपण आयपीएल स्पर्धेतही खेळणार नसल्याचे जरी युवराजने त्यावेळी सांगितले असले तरीही आता मुश्‍ताक अली स्पर्धेत जर युवराजला संधी मिळाली तर आयपीएल स्पर्धेतील पुनरागमनाचीही शक्‍यता वाढणार आहे.

मुश्‍ताक अली स्पर्धेसाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याला अंतिम संघात स्थान मिळणार हे स्पष्ट दिसत असल्यामुळे या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली तर पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या लिलावात देखील तो मोठा भाव खाईल, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.