“युवा माहिती दूत’ योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणार

पुणे – राज्य शासनाच्या उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आणि शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने “युवा माहिती दूत’ हा उपक्रम येत्या 1 ऑगस्टपासून राबविण्यात येणार आहे. महाविद्यालयांमधील विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना किमान एक कोटी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमात महाविद्यालये व जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना दिल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात 6 हजारांपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात 23 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी किमान 5 ते 7 टक्‍के विद्यार्थी म्हणजेच किमान 1 लाख युवक या उपक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. शासकीय योजना प्रभावीपणे थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरुण वर्गाचे सहाय घेण्याचा हा उपक्रमाचा महत्त्वाचा हेतू असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोबाईल अॅॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. याद्वारे विद्यार्थी सर्व माहिती संबंधितांना समजावून सांगतील. सहा महिने कालावधीसाठी युवा माहिती दूताचे काम राहील. त्यांना तसे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयाने एका शिक्षकाचा युवा माहिती दूत मार्गदर्शक म्हणून नियुक्‍ती करावेत, असेही उच्च शिक्षण विभागाने म्हटले आहे.

युवा माहिती दूत उपक्रमाचे स्वरुप, कार्यपद्धती व आवश्‍यकता स्पष्ट करणारी माहितीचा मसुदा उच्च शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार महाविद्यालयांनी कार्यवाही करावे. या कार्यवाहीचा अहवाल सात दिवसांत पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागाकडे सादर करावेत, असे सहसंचालक विजय नारखडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)