#TeamIndia : भारताच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूचा क्रिकेटला अलविदा

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाणची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाण याने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे आज जाहीर केले आहे. युसुफने स्वत: ट्विटवर प्रसिद्धी पत्रक जाहीर करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

युसुफने त्याच्या कुटुंबांचे, मित्रांचे, चाहत्यांचे  त्याबरोबरच संघ, प्रशिक्षक तसेच सर्व देशवासियांनी दिलेल्या पाठिंबा व प्रेमाबद्दल मनापासून आभार मानले आहेत. तसेच या ट्विटमध्ये युसुफने 2011 सालच्या विश्वचषकातील सचिनबरोबरचा फोटो आणि 2007 विश्वचषकातील लहान भाऊ इरफान पठाण बरोबरील फोटो शेअर करत आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

युसुफ हा 2007 मध्ये झालेल्या  टी-20 विश्वचषक आणि 2011 मधील एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे.

युसूफ पठाणची आंतरराष्ट्रीय कारकिर्द –

युसूफने टी 20 आणि वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केलं होत .  युसूफने आपल्या कारकिर्दीत टी-20 मध्ये 22 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 57 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

युसूफने टी 20 मध्ये एकूण 22 सामन्यांमध्ये 146.58 स्ट्राईक रेटने 236 धावा केल्या. तसेच 13 विकेट्सही मिळवल्या. तसेच एकूण 57 एकदिवसीय सामन्यामध्ये त्याने 2 शतक आणि 3 अर्धशतकांसह 810 धावा केल्या. 123 ही त्याची वनडेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. सोबतच त्याने 33 बळीही घेतले आहेत.

आयपीएल कारकिर्द – 

आयपीएलमध्ये युसुफने कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व केले असून त्याने एकूण 174 सामने खेळले आहेत. यात त्याने 3,204  धावा केल्या असून यात1 शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरच त्याने आयपीएलमध्ये 42 बळीही घेतले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.