बारामती : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. कारण या ठिकाणी नणंद – भावजय यांच्यात लढत झाली होती. यामध्ये सुप्रिया सुळेंनी बाजी मारत बारामती लोकसभा जिंकली होती. यानंतर आता बारामती विधानसभेसाठी पुन्हा एकदा पवारांच्या कुटुंबातच सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे जाहीर संकेत दिले आहेत. या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार हे अजित पवार यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या राज्यात सुरू आहे. याच यात्रेचा भाग म्हणून बारामती इथं काल जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष भाष्य केलं. बारामती विधानसभा निवडणूक युगेंद्र पवार हेच लढवतील असे संकेत त्यांनी यावेळी दिले. त्यांनी युगेंद्र पवारांचं कौतुक केलं. ‘युगेंद्र पवार हे अलीकडं राजकारणात रस घेऊ लागले आहेत. पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडं फिरू लागले आहेत. तरुण नेतृत्वाला कसा पाठिंबा मिळू शकतो हे युगेंद्रदादांच्या रुपानं आपण गावागावांत बघतो. ते जिथं-जिथं जातायत, तिथं कार्यकर्ते उत्साहानं पुढं येत आहेत. सार्वजनिक जीवनात युगेंद्रदादांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून कार्यकर्तेही त्यांना साथ देत आहेत. बारामती विधानसभेचं भविष्य नव्या रक्ताकडे, नव्या हातात देण्याची उत्सुकता सर्वांना दिसेतय. हे कामही सगळे कार्यकर्ते योग्य पद्धतीनं करतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे ते खजिनदार आहेत. तसंच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. बारामतीमधील सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतल्यानंतर श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार हे मोठ्या पवारांसोबत राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र यांनी सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत बारामती विधानसभेत सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी मिळाली होती. तेव्हापासूनच युगेंद्र पवार यांचं नाव बारामती विधानसभेसाठी मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते.