बारामती : लोकसभेनंतर आता पुन्हा एकदा बारामती मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे विधानसभेसाठी काकांच्या विरोधातच शड्डू ठोकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे कधीही झुकला नाही, ना यापुढे झुकेल, असे म्हणत आजपासून बारामती विधानसभा मतदारसंघात ‘स्वाभिमान यात्रा’ सुरू केली आहे.
राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार यांनी भाजपसोबत संसार थाटल्याने बारामतीचे सारे गणिते बदलून गेली आहेत. एरवी बारामतीतून दीड लाखांनी निवडून येणारे अजित पवार निवडणुकीला उभे राहावे की नाही याबद्दल साशंकता व्यक्त करतायेत. दुसरीकडे दादांना कुटुंबातूनच आव्हान देऊन विधानसभेची लढाई जिंकण्याची रणनीती त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार करत आहेत. त्यामुळे आता जर विधानसभेला अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली तर कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार ?
33 वर्षांचे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील ते व्यवसायिक आहेत. अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करुन घेतात असं कायमच सांगितलं जातं. श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते कायमच दिसतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ सोडली.
युगेंद्र हे फलटणस्थित शरयू ऍग्रो इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शरयू साखर कारखाना त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. आपल्या आजोबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना एकत्र आणून स्थापन केलेल्या महाराष्ट्र ऑरगॅनिक रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन च्या माध्यमातून सेंद्रिय आणि शाश्वत शेतीला चालना देण्याचे काम ते करतात. तसेच ते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे ते विश्वस्त आणि खजिनदार आहेत तसेच ते बारामती तालुका कुस्तिगीर परिषदेचेही प्रमुखही आहेत.