भरतीची घोषणा होताच युवक लागले तयारीला
चऱ्होली – राज्यात पोलीस भरती होणार असल्याने अनेक युवक या भरतीकरिता तयारीला लागले आहेत. परंतु करोनामुळे क्लास, शाळा, ऍकॅडमींना सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे दिघी परिसरातील युवक घरीच अभ्यास करून शारीरिक कसरतींसाठी रस्त्यांवरच व्यायाम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दिघी परिसरातील युवक पोलीस भरतीकडे लक्ष ठेवून होते. अनेकांनी शासनाने घोषणा करताच तयारीला सुरुवात केली आहे. या भरतीकरिता तयारी करणाऱ्या युवकांना मोठी अपेक्षा आहेत. सध्या करोनामुळे सर्व जगात हाहाकार असताना शहरातील व ग्रामीण भागातील युवक आगामी पोलीस भरतीकरिता तयारी करताना दिसत आहेत.
आळंदी-दिघी पालखीमार्गावर असलेल्या दत्तगड परिसरात व साई मंदिर परिसरातील रस्त्यावर युवक सकाळी व्यायाम, धावणे आदी सराव करताना दिसून येत आहेत. दिघीमध्ये युवकांच्या व्यायाम किंवा प्रशिक्षणाकरिता कोणत्याही अद्ययावत सुविधा नसल्याने अनेक युवक दररोज आपआपल्या परीने व्यायाम व प्रशिक्षणाची तयारी करत आहेत.
दिघी परिसरात लष्करी प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे या प्रभागातील माजी सैनिक व पोलीस मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. दिघीतील अनेक युवक देशसेवा करण्याकरिता सैनात भरती झाले असून अनेकजण पोलीस विभागात सुद्धा कार्यरत आहेत. सध्या देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याने आगामी पोलीस भरतीमध्ये दिघी परिसरातील युवकाना मोठी अपेक्षा आहे.
दिघीमधील अनेक युवक आगामी पोलीस भरतीकरिता तयारी करीत आहेत. युवकांना व्यायाम व प्रशिक्षणाकरिता कोणतीही व्यवस्था नसल्याने युवकांना रस्त्यावर व्यायाम तसेच धावावे लागत आहे. प्रशासनाने युवकांकरिता खेळाचे मैदान व अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिल्यास युवकांना रस्त्यावर व्यायाम करण्याची वेळ येणार नाही. याशिवाय अनेक पोलीस व सैन्य भरतीकरिता युवकांना चांगली संधी प्राप्त होऊ शकते.
– अमित गमरे, खेळाडू